दुसरा घरोबा करून पहिल्या पतीला धमकावून १५ लाख लुबाडले : वडगाव शेरीतील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पहिला विवाह असतानाही घटस्फोट न घेता दुसऱ्यासोबत घरोबा केला. दुसऱ्या घरोब्यात खूश नसल्याचे सांगून “पुन्हा तुझ्याकडे यायचं आहे” असं म्हणून पतीकडून १५ लाख १८ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. पतीने हे पैसे परत मागितल्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सिडनी लॉरेन्स दोरायराज (वय ३९, रा. शिलानंद हाऊसिंग सोसायटी, सोमनाथनगर, वडगाव शेरी) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत सिडनी यांचे मोठे भाऊ स्टॅन्ली लॉरेन्स दोरायराज (वय ४१) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी स्वाती सिडनी दोरायराज (वय ३२) व चेतन मोरे (वय ३५, रा. श्रीनिवास टेनामेंट, बडोदा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ७ नोव्हेंबर २०१४ ते २२ जून २०२५ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती आणि सिडनी यांचा विवाह २०१४ मध्ये झाला होता. त्यानंतर स्वातीचे चेतन मोरे याच्याशी प्रेमसंबंध जुळले. कायदेशीर घटस्फोट न घेता ती आरोपी चेतन मोरेसोबत राहू लागली.
या दोघांनी संगनमत करून कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा खटला दाखल केला. “मी या लग्नात खूश नाही, मी तुझ्याकडे परत येणार आहे, मला तुझ्यासोबतच राहायचं आहे,” असे तिने पती सिडनीला सांगितले. त्यानंतर स्वातीने परत नांदायला येते, असे आमिष दाखवून वेळोवेळी सिडनीकडून १५ लाख १८ हजार रुपये घेतले.
त्यानंतर स्वाती नांदायला न आल्याने सिडनीने तिच्याकडे विचारणा केली. त्याने पैसे मागितले असता, “मी तुझ्यावर केस करीन, तुझं पूर्ण कुटुंब जेलमध्ये पाठवेन, तू पैसे पाठवले नाहीस तर तुझ्यावर बलात्काराची केस करीन,” अशी धमकी स्वातीने त्याला दिली.
पत्नीच्या छळामुळे आणि धमक्यांमुळे सिडनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.
