बार्शीत ‘मेघदूत’ पुरस्कार वितरण सोहळा : वडगबाळकर यांचे चिंतनशील साहित्याबाबत विचारप्रकट
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : कवी समाजाच्या अंतरंगात डोकावतो. असत्याच्या विरोधात सत्याची बाजू घेणारा असतो. चिंतनशील कविता लिहिताना अशा साहित्याने अस्वस्थ करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका श्रुती वडगबाळकर यांनी केले.
कवी कालिदास मंडळ, बार्शी यांच्या वतीने आयोजित ३३व्या कालिदास महोत्सवात आयोजित ‘मेघदूत’ पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या, “काळ वेगाने बदलतोय. संयम हरवलेली पिढी अनुभवताना साहित्यिकांवर मोठी जबाबदारी आहे. कवीने अशा वेळी संभ्रमित न होता अभ्यासपूर्वक विचार मांडायला हवेत.”
या सोहळ्यात कवयित्री कांचन सावंत यांना ‘रंध्रात भिनावा छंद’ या काव्यसंग्रहासाठी आणि कवयित्री शुभांगी काळे यांना ‘प्राजक्त अक्षरांचा’ या संग्रहासाठी ‘मेघदूत’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल वृक्ष संवर्धन समितीला सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कादर शेख होते. त्यांनी आपल्या भाषणात मंडळाच्या सातत्यपूर्ण कार्याची प्रशंसा केली आणि सांगितले की, “माझी जडणघडण साहित्याच्या सहवासामुळेच झाली आहे.”
कार्यक्रमात ‘मेघदूत’ पुरस्कार प्राप्त कवींचे मनोगत, वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे, म.सा.प.चे अध्यक्ष पां.न. निपाणीकर, नाट्य परिषद अध्यक्ष सोमेश्वर घाणेगावकर, परीक्षक डॉ. रविराज फुरडे, आणि सौ. सुमन चंद्रशेखर यांची भाषणे झाली.
या वेळी पुरस्कारप्राप्त काव्यसंग्रह बार्शीतील विविध सार्वजनिक वाचनालयांना मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे यांनी केले. सूत्रसंचालन अर्चना देशपांडे-पोळ यांनी केले तर आभार प्रदर्शन आबासाहेब घावटे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश गव्हाणे, दत्ता गोसावी, शिवानंद चंद्रशेखर, जयसिंग रजपूत, मुकुंदराज कुलकर्णी, शारदा पानगावकर, संतोष जोशी, गिरीश सोनार, सागर कुलकर्णी आदींनी विशेष मेहनत घेतली. या सोहळ्याला डॉ. चंद्रकांत मोरे, प्रा. प्रमिला देशमुख, डॉ. रजनी जोशी, हरिश्चंद्र पाटील, अतुल सोनिग्रा, बी. आर. देशमुख यांच्यासह अनेक साहित्यरसिक उपस्थित होते.
