नांदण्यास येण्यास दिला होता नकार : विमानतळ पोलिसांनी पतीला केली अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कौटुंबिक वादातून नांदण्यास येण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
ममता प्रेम जाधव (वय २१, रा. काजळी तांडा, पिंपळगाव, ता. जिंतूर, जि. परभणी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत ममता हिची मावशी रेश्मा रामेश्वर राठोड (वय २८, रा. खांदवेनगर, लोहगाव) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी पती प्रेम उत्तम जाधव (वय २७, रा. काजळी तांडा, पिंपळगाव, ता. जिंतूर, जि. परभणी) याला अटक केली आहे. ही घटना खांदवेनगर येथे रविवारी दुपारी सव्वा तीन वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता या परभणी जिल्ह्यातील काजळी तांडा परिसरात राहत होत्या.
ममताचा पतीबरोबर वाद सुरू होता. सततच्या वादामुळे ममता पतीचे घर सोडून पुण्यातील लोहगाव येथे राहणाऱ्या मावशी रेश्मा राठोड यांच्या घरी राहण्यास आली होती. गेल्या काही दिवसांपासून प्रेम तिला नांदण्यासाठी ये, असा आग्रह करत होता.
मात्र, तिने नांदण्यास नकार दिला. त्यामुळे प्रेम पुण्यात आला आणि खांदवेनगरमधील मावशीच्या घरी गेला. तेथे ममताने पुन्हा नकार दिल्याने प्रेमने चाकूने ममताच्या गळ्यावर वार केला. तिला वाचविण्यासाठी धावून आलेल्या रेश्मा राठोड यांनाही त्याने जखमी करून तेथून पळ काढला.
जखमी अवस्थेत ममताला रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. विमानतळ पोलिसांनी प्रेम जाधव याला अटक केली आहे. हा तपास पोलीस निरीक्षक शरद शेळके करत आहेत.
