१२५व्या जन्मजयंतीनिमित्त विविध उपक्रम व पुरस्कार सोहळा उत्साहात पार
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : राष्ट्रसंत आचार्य भगवंत परमपूज्य श्री आनंदऋषीजी महाराज सा. यांच्या १२५व्या जन्मजयंतीनिमित्त दिला जाणारा राज्यस्तरीय “गुरु आनंद पुरस्कार २०२५” सोहळा श्री आनंद दरबार येथे वात्सल्यमूर्ती प. पू. श्री इंदूप्रभाजी म. सा. यांच्या पावन सान्निध्यात आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला.
या निमित्ताने पुण्यात महाप्रसादी, भव्य रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि औषध वाटप यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वर्षीच्या ‘गुरु आनंद पुरस्कार २०२५’ अंतर्गत कर्तव्यरत्न पुरस्कार आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी शरद झिने, सावित्रीची लेक पुरस्कार पुणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे, आदर्श पत्रकार पुरस्कार जैन संदेशचे संपादक सुभाष लुंकड आणि दैनिक सकाळचे पत्रकार किशोर गरड यांना प्रदान करण्यात आले.
पुरस्कार वितरणानंतर आयोजित ‘आनंद’ प्रवचनात प. पू. श्री इंदूप्रभाजी म. सा. यांनी श्रद्धा, समर्पण आणि विवेकपूर्ण जीवनशैलीवर भर देत आनंदऋषीजींच्या जीवनातील गुण अंगीकारण्याचे मार्गदर्शन केले.
या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित चकोर गांधी यांनी आपल्या मनोगतात बाळासाहेब धोका यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की जैन समाजाच्या हितासाठी धोका यांनी प्रशासन, पोलीस, पत्रकार आणि विविध घटकांना सोबत घेऊन कार्य सुरू केले असून ही बाब समाजासाठी अत्यंत गौरवास्पद आहे.
यावेळी आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि भारतातील पहिले ‘ऊर्जा चरण’ व आनंद दरबारतर्फे सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
या कार्यक्रमास चकोर गांधी, नगरसेवक युवराज बेलदरे, संतोष ताठे, दीपक बेलदरे, अंकुश जाधव, संदीप बेलदरे, सुधीर कोंढरे, तुषार बंब, देवीदास जाधव, नितीन जांभळे आदी मान्यवर उपस्थित होते. महाप्रसादीचा लाभ नगरसेवक युवराज बेलदरे व लीलाबाई बन्सीलाल ओस्तवाल यांच्या परिवारास मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ धोका यांनी केले, तर आभार प्रदर्शन चातुर्मास समितीचे अध्यक्ष उमेदमल धोका यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद दरबार कार्यकारिणीतील जुगराज चत्तर, दिलीप संचेती, सुभाष लूणावत, पंकज बाफना व इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.
