महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शीतील युवा उद्योजक सूरज ठोंबरे यांना एस्कॉर्ट्स कुबोटा ट्रॅक्टर कंपनीतर्फे दिला जाणारा भारतामधील सर्वोच्च ‘सी.एम.डी. ट्रॉफी’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. गुरुग्राम (हरियाणा) येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला.
धाराशिव ट्रॅक्टर्स हे बार्शीतील के. टी. ट्रॅक्टर्स परिवाराशी संलग्न असून, धाराशिव जिल्ह्यातील अधिकृत कुबोटा ट्रॅक्टर वितरक आहेत. देशभरातील ३५० डीलर्सपैकी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विक्रेत्यांना दरवर्षी एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीतर्फे सन्मानित करण्यात येते.
यंदा विक्री वाढ, ग्राहक समाधान, सेवा-सपोर्ट, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि स्पेअर पार्ट्स उपलब्धता या मापदंडांवर धाराशिव ट्रॅक्टर्सने आघाडी घेत ही प्रतिष्ठित ट्रॉफी पटकावली. या पुरस्काराचा गौरव कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निखिल नंदा, उपव्यवस्थापकीय संचालक सेजी फुकुओका, मुख्य अधिकारी गुरमीतसिंग ग्रेवाल, मुख्य वित्तीय अधिकारी भारत मदान आणि कॉर्पोरेट नियोजन विभागाचे अधिकारी अकिरा काटो यांच्या हस्ते करण्यात आला.
या यशाविषयी बोलताना सूरज ठोंबरे म्हणाले, “सातत्य, जिद्द आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे हे यश मिळाले. माझ्या टीमने शोरूमला स्वतःचे समजून दिलेल्या सेवेचे हे फळ आहे. ग्राहकांना तत्पर सेवा, अनुभवी मेकॅनिक, सहज उपलब्ध स्पेअर पार्ट्स आणि सेवा नीतीमत्तेच्या जोरावर आम्ही ग्राहकांचे मन जिंकू शकलो.”
ते पुढे म्हणाले, “कंपनीचे अधिकारी आशुतोष देशमुख (उपाध्यक्ष), सचिन राजमाने (झोनल सेल्स मॅनेजर), जितेंद्र तांबारे (प्रादेशिक विक्री व्यवस्थापक) आणि गणेश पाटकुलकर (क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक) यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी मोलाचे ठरले.”
सूरज ठोंबरे हे बार्शीतील नामवंत उद्योजक संतोष ठोंबरे यांचे पुतणे असून, अल्पावधीतच त्यांनी उद्योगजगतात आपल्या कार्यक्षमतेने वेगळी ओळख निर्माण केली आहे.
