कोल्हेवाडी येथील घटना : नांदेड सिटी पोलिसांनी ६ जणांना केली अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : रोडने जात असताना दुचाकी गाडी कारला घासल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वादावादी झाली. यामध्ये भर रस्त्यावर एकामागोमाग तीन गोळ्या झाडण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. सिंहगड रोडवर एकाच दिवशी गोळीबाराच्या दोन घटना घडल्या.
याबाबत सिद्धार्थ जाधव यांनी नांदेड सिटी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आकाश चव्हाण (वय २४), अभिजित चव्हाण (वय ३१), साहिल चव्हाण (वय २४), प्रभात चव्हाण (वय ३४), गितेश जाधव (वय २०), आणि मंदार चव्हाण (वय ४९, सर्व रा. खडकवासला) यांना अटक केली आहे.
ही घटना सिंहगड रोडवरील कोल्हेवाडी येथे सोमवारी सायंकाळी ७ वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित चव्हाण यांचा बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. ते आपली कार घेऊन जात असताना गर्दीत सिद्धार्थ जाधव यांची दुचाकी त्यांच्या कारला घासली.
त्यावरून भर चौकात त्यांच्यात वादावादी सुरू झाली. तेव्हा सिद्धार्थ जाधव यांनी त्यांच्या मित्रांना बोलावून घेतले. अभिजित चव्हाण यांनीदेखील आपल्या नातेवाइकांना बोलावून घेतले. दोन्ही गटातील तरुण आल्याने हाणामारी सुरू झाली.
त्याचवेळी साहिल चव्हाण याने त्याच्याकडील गावठी पिस्तुलातून एकामागोमाग तीन गोळ्या हवेत झाडल्या. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. सायंकाळच्या वेळी आजूबाजूला अनेक लोक घरी जाण्यासाठी किंवा खरेदीसाठी जमले होते.
गोळीबाराच्या आवाजाने तेथील नागरिकांची धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस पथक, तसेच नांदेड सिटी व सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते.
या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल बोस यांनी सांगितले की, “गाडी घासल्यावरून दोन गटांमध्ये वादावादी झाली. त्यात साहिल चव्हाण याने त्याच्याकडील गावठी पिस्तुलातून गोळीबार केला.” घटनास्थळी पोलिसांना दोन रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत.पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
