अल्पवयीनावर खोटा आरोप करून पोलिसांची दिशाभूल : चौघांना अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पबजी खेळण्याच्या वेळी पिस्तुल हाताळताना गोळी सुटून एका तरुणाचा पाय जखमी झाला. यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मित्रांनी एका अल्पवयीन मुलाचे नाव पुढे केले. मात्र, पोलिसांच्या तपासात खरी घटना उघड झाली असून चार जणांना अटक करण्यात आली आहे.
जखमी तरुणाचे नाव संकेत संजय मोहिते (वय २०, रा. प्रसन्न मूर्ती कॉम्प्लेक्स, सरस्वती नगर, शिवणे) असे असून ही घटना मंगळवारी पहाटे सव्वा वाजता उत्तमनगर येथे घडली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये जखमी संकेत मोहिते, जाफर सादिक अली शेख (वय २०), पार्श्वनाथ शिरीष चाकोते (वय २५), वैभव लक्ष्मण धावडे (वय २२) आणि सागर प्रदीप कोठारी (वय २०, सर्व रा. शिवणे) यांचा समावेश आहे.
डेक्कन येथील सह्याद्री रुग्णालयात गोळी लागल्याने संकेत मोहिते याला दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी चौकशी केली असता सुरुवातीला मोहिते याने, शिवणेतील एका अल्पवयीन मुलाने पिस्तुल दाखवत असताना गोळी सुटून ती त्याच्या पायाला लागल्याचे सांगितले. परंतु पोलिसांनी अल्पवयीन मुलाची चौकशी केली असता त्याचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी पुन्हा मोहिते याच्याकडे चौकशी केली असता खरी हकीकत समोर आली. उत्तमनगर येथील जाफर सादिक अली शेख यांच्या घरात सर्वजण पबजी खेळत होते. यावेळी सागर कोठारी याने त्याच्याकडे असलेले पिस्तुल काढून मित्रांना दाखवण्यास सुरुवात केली. पिस्तुल लोड- अनलोड करताना ते अडकल्याने पार्श्वनाथ चाकोते याने ते हाताळण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी पिस्तुलातून गोळी सुटून ती संकेत मोहितेच्या डाव्या पायाच्या नडगीला लागली. जखमी व आरोपी हे सर्वजण मित्र असल्याने, स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि शिक्षा टाळण्यासाठी त्यांनी अल्पवयीन मुलाचे नाव सांगून त्याला अडकविण्याचा कट रचला. मात्र पोलिसांच्या तपासात सत्य बाहेर आले
उत्तमनगर पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. सागर कोठारी याने हे पिस्तुल कोणाकडून व कोणत्या कारणासाठी घेतले, याचा तपास सुरू आहे.
