फुरसुंगीतील घटना; पती, सासू, सासरे, दीर, जाऊवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पती कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करत नसल्याने घर चालवण्यासाठी वडिलांची मदत घ्यावी लागत होती. बचत गटामार्फत किराणा दुकान सुरू केल्यावरही सासरी होणारा शारीरिक आणि मानसिक छळ वाढला. या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी येथे घडली आहे. या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत विवाहितेचे नाव सीमा अक्षय राखपसरे (वय २४, रा. चंदवाडी, स्मशानभूमीजवळ, फुरसुंगी) असे आहे. याबाबत तिचे वडील रवी हिरामण खलसे (वय ५०, रा. फुलेनगर, पंचवटी, नाशिक) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यावरून पोलिसांनी पती अक्षय सुरेश राखपसरे, चुलत सासरे वसंत राखपसरे, सासू आशाबाई सुरेश राखपसरे, दीर अविनाश सुरेश राखपसरे आणि जाऊ पुजा अविनाश राखपसरे (सर्व रा. फुरसुंगी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमाचा विवाह ६ जुलै २०२० रोजी अक्षय राखपसरे याच्याशी झाला होता. त्यावेळी पतीकडे सर्व्हिस सेंटर असल्याचे सांगण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात तो काहीच काम करत नव्हता.
लग्नासाठी वडिलांनी रोख ५० हजार रुपये दिले होते. दाम्पत्याला ३ वर्षांचा मुलगा आणि दीड वर्षांची मुलगी आहे. पतीकडे उत्पन्न नसल्यामुळे सीमाचा व तिच्या मुलांचा खर्च वडीलच भागवत होते. अक्षय हा गुंड प्रवृत्तीचा असून किरकोळ कारणावरून सीमाला मारहाण करायचा.
मुलांच्या शिक्षणासाठी पैसे लागतील म्हणून नोकरी करण्याचा सल्ला सीमाने दिला की, घरात वाद व्हायचा. मोठी जाऊ पुजा ही सासूची भाची असून ती सतत सीमाविरुद्ध चुगली करायची. सीमाने बचत गटातून किराणा दुकान सुरू केले होते, मात्र कपडे आणि इतर खर्चासाठीचे पैसे वडिलांकडूनच मिळत होते.
६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता फिर्यादींना मुलीच्या चुलत दीराच्या मोबाईलवरून फोन आला की, “तुमच्या बहिणीच्या दशक्रिया विधीला सीमाला यायला मिळाले नाही, त्यामुळे तिने फाशी घेतली.” फिर्यादी तातडीने पुण्यात आले, पण त्यांना सीमाला भेटू दिले नाही. डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
सासरी होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून सीमाने फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. तिच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर वडिलांनी फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बापुसाहेब खंदारे करीत आहेत.
