बनावट टी-शर्ट, नायट्रो शूज, चप्पल, ट्रॅक पॅन्टसह ८ लाखांचा माल जप्त : आंबेगाव पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुमा कंपनीचे कॉपीराईट असलेले वेगवेगळ्या रंगांचे बनावट टी-शर्ट, नायट्रो शूज, चप्पल, ट्रॅक पॅन्टवर पुमा कंपनीचे नाव व लोगो वापरून कॉपीराईट कायद्याचा भंग करणाऱ्या आंबेगावातील दुकानावर पोलिसांनी छापा टाकला. या दुकानातून ८ लाख १३ हजार ७५० रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत महेंद्र सोहनसिंग देवरा (वय ३६, रा. बिरोलिया, पेरवा, ता. बाली, पाली, राजस्थान) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी शिवम लालबाबू गुप्ता (वय २५, रा. लिपाणे वस्ती, आंबेगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई आंबेगावमधील स्टायलॉक्स फॅशन शॉपमध्ये ८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुमा से कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. आंबेगाव येथील दुकानामध्ये पुमा से कंपनीचे बनावट टी-शर्ट, शूज, चप्पल, ट्रॅक पॅन्ट विकले जात असल्याची माहिती मिळाली.
त्यावरून आंबेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने स्टायलॉक्स फॅशन शॉपमध्ये छापा टाकण्यात आला. त्यात २ लाख ३२ हजार रुपयांचे टी-शर्टचे २९० नग, २ लाख ४९ हजार रुपयांचे नायट्रो शूजचे ५९ जोड, २ लाख ३७ हजार रुपयांच्या पॅन्टचे १९८ नग असे एकूण ८ लाख १३ हजार ७५० रुपयांचे साहित्य कॉपीराईट कायद्याचा भंग करून विक्री करताना आढळून आले.
पोलिसांनी हा माल जप्त केला असून सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करीत आहेत.
