मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, पोलीस दलातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता, पुणे शहर पोलीस दलाला आणखी ५ नवीन पोलीस ठाण्यांना मान्यता देत आहोत. त्याचबरोबर या पोलीस ठाण्यांसाठी आणखी ५०० कर्मचार्यांचे मनुष्यबळही देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली.
पुणे शहर पोलीस दलाअंतर्गत विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री दत्ता भरणे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, याआधी पुणे शहर व पिंपरी-चिंचवडसाठी ७ पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली होती. त्यासाठी ८०० पोलीस कर्मचार्यांचे मनुष्यबळही मंजूर केले आहे. वाढता विस्तार लक्षात घेता लोहगाव, मांजरी, नर्हे, येवलेवाडी, लक्ष्मीनगर या नवीन ५ पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात येत आहे. सर्व अधिकारी येथे आहेत, त्यांच्या साक्षीने ही घोषणा करत आहे.
पुणे शहरासाठी ५ मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅनचे आज लोकार्पण होत आहे. ही अत्याधुनिक व्हॅन आहे. दंगल अथवा महत्त्वाच्या घटनांच्या ठिकाणी गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्याचे काम ही व्हॅन करू शकेल. या व्हॅनमध्ये ड्रोन सुविधा असून त्यावर ३६० अंशात फिरणारे कॅमेरे आहेत. गर्दीच्या ठिकाणी हे छोटे पोलीस आयुक्तालय असणार आहे.
देशातील सर्वात अत्याधुनिक सीसीटीव्ही प्रणाली पुण्यात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पुण्यात २ ऑगस्ट २०१५ मध्ये सर्वप्रथम सीसीटीव्ही बसविण्यात आले. आता देशातील अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. त्यात नाईट व्हिजन, ३६० अंशात फोटो घेणारे कॅमेरे आहेत. या सर्व सीसीटीव्हीचे एकात्मिक कंट्रोल रूम ही अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असणार आहे. त्यामुळे आता गुन्हेगारांना सांगावे लागेल ‘‘बच के रहना, तुम पे नजर है’’ हिंदी चित्रपटातील गाणे प्रत्यक्षात येताना दिसणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘दृष्टी’ इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचे उद्घाटन, मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅन व ड्रोन फ्लॅग ऑफ, चंदननगर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन, लोणी काळभोर, नांदेड सिटी, खराडी, कोंढवा पोलीस ठाण्यांच्या नवीन इमारतींचे भूमिपूजन, आयटीएमएस यंत्रणेची उद्घोषणा आणि ‘मिशन परिवर्तन’ मोहिमेचे सादरीकरण करण्यात आले.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रास्ताविकात सर्वांचे स्वागत केले, तर सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी आभार मानले.
हिंजवडी येथील रस्ता रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. तेव्हा लोक म्हणाले, तुम्ही इतरांची बांधकामे काढता, पण पुलाच्या पुढे गेल्यावर औंध येथील पोलिसांच्या दोन इमारती अजून तशाच आहेत. कितीतरी दिवस झाले. जरा कामातून वेळ काढा, त्याला मान्यता द्या. त्यामुळे आमच्या पुण्यातील वाहतूक कोंडी काहीशी कमी होईल. आम्ही जी कामे सांगतो, ती सार्वजनिक कामे असतात; वैयक्तिक कामे सांगत नाही.
अजित पवार यांनी अपर मुख्य सचिवांना सुनावले
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी येणार्या अडचणीत पोलीस खात्याच्या वास्तूबद्दल अजित पवार यांनी भर कार्यक्रमात स्टेजवरून उपस्थित असलेल्या अपर मुख्य सचिव इक्बाल चहल यांना सुनावले. अजित पवार म्हणाले, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बंडगार्डन पोलीस ठाण्याची इमारत हलविण्याबाबतचा आदेश निघाला आहे. आपण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केल्या आहेत, तरी ते काम अजून झाले नाही. तेव्हा पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की, माझ्याकडून फाईल वर गेली आहे. ‘वर’ म्हणजे चहल यांच्याकडे. चहल, मला ते परत सांगायला लावू नका, ही माझी विनंती आहे.