पतीच्या धमकीने विवाहितेने रक्षाबंधनाच्या दिवशीच केली आत्महत्या
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गेल्या वर्षी लग्न झाल्यानंतर शेतजमीन घेण्यासाठी माहेरकडून ५ लाख रुपये घेतले होते. त्यानंतर कंपनी चालविण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी तिच्याकडे केली जात होती. ती कोठे राहते, याची तिच्या माहेरच्या लोकांना काहीच कल्पना नव्हती. तिला दोन भाऊ आहेत. हे भाऊ रक्षाबंधनाला आले तर मारून टाकू, अशी धमकी दिली. या धमकीला घाबरून नवविवाहितेने रक्षाबंधनाच्या दिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
स्नेहा विशाल झेंडगे (वय २७) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचे वडील कैलास मच्छिंद्र सावंत (वय ५०, रा. कर्देहळी, ता. दक्षिण सोलापूर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी पती विशाल झेंडगे, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे, दीर विनायक झेंडगे, नणंद तेजश्री थिटे व तिचे पती परमेश्वर थिटे तसेच भाऊसाहेब कोल्हाळ (रा. फ्लॅट क्रमांक ६०४, फेज ३, जी व्ही ७, आंबेगाव बुद्रुक) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी ९ ऑगस्ट रोजी दुपारी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा व विशाल झेंडगे यांचा विवाह २ मे २०२४ रोजी झाला होता. विवाहानंतर त्यांनी शेतजमीन घेण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार तिच्या वडिलांनी विशाल याला ५ लाख रुपये दिले.
झेंडगे यांची भोर तालुक्यातील वेळू येथे कंपनी आहे. फ्रीज व इतर वस्तूंसाठी स्पेअर पार्ट बनविण्याची त्यांची कंपनी आहे. काही दिवसांनंतर त्यांनी कंपनी चालविण्यासाठी २० लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करून तिला वेळोवेळी शिवीगाळ करून मारहाण केली जात होती.
त्याबाबत तिने एकदा पोलिसांकडे तक्रारही केली होती. तेव्हा स्नेहाच्या सासऱ्यांचे सांडू भाऊसाहेब कोल्हाळ यांनी तिला दम देऊन दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यास भाग पाडले होते. त्यानंतरही तिचा छळ सुरूच राहिला होता.
रक्षाबंधनाला तुझे भाऊ आले तर मारून टाकू, असा दम तिला दिला होता. या छळाला कंटाळून स्नेहा हिने रक्षाबंधनाच्या दिवशीच दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियंका कदम करीत आहेत.
कोठे राहते माहिती नव्हते – याबाबत स्नेहाचे वडील कैलास सावंत यांनी सांगितले की, त्यांच्या मागणीप्रमाणे मुलीचे लग्न लावून दिले होते. त्यावेळी ते मोहोळला राहत होते. विशाल याच्या मागणीप्रमाणे त्याला शेतजमीन घेण्यासाठी ५ लाख रुपये दिले होते.
लग्नानंतर काही महिने मोहोळला राहिल्यावर ते पुण्यात रहायला आले. ते कोठे राहतात, याची आम्हाला त्यानंतर काही माहिती मिळाली नाही. झेंडगे यांची वेळू येथे कंपनी आहे. स्नेहाचे भाऊ या कंपनीत माहिती घेण्यासाठी गेले होते.
त्यावेळी त्यांना हाकलून लावले होते. तिच्याकडे फोनही नव्हता. त्यामुळे ती कोणाशी संपर्क करू शकत नव्हती. स्नेहा हिने शनिवारी दुपारी आत्महत्या केली तरी त्याची माहिती आम्हाला दिली नाही. पोलिसांनी रात्री १० वाजता कळविल्यावर आम्ही पहाटे ४ वाजता पुण्यात पोहोचलो.
अजूनही ते आंबेगावात कोठे राहत होते, हे आम्हाला माहिती नाही. भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिल्यावर आता आम्ही त्यांच्याकडून तिचे पार्थिव घेऊन अंत्यसंस्कारासाठी गावी घेऊन जात आहोत, असे तिचे वडील कैलास सावंत यांनी सांगितले.
