त्रुटी आढळल्यास कडक कारवाई : साहेबराव देसाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
सोलापूर : अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या निर्देशानुसार, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दि. ११ ऑगस्ट २०२५ ते दि. १८ ऑगस्ट २०२५ या सात दिवसांच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात मिठाई, खवा, फरसाण, चिवडा इत्यादी अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांवर विशेष धडक तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
सणासुदीच्या काळात या पदार्थांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने, काही ठिकाणी भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व आस्थापनांची सखोल तपासणी केली जाणार असून, वापरले जाणारे तेल, तूप, दूध व अन्य पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत.
“स्वच्छ, सुरक्षित आणि निर्भेळ अन्नपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करणे ही अन्न व्यावसायिकांची जबाबदारी आहे. तपासणीदरम्यान कोणतीही त्रुटी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई, अन्न व औषध प्रशासन, सोलापूर यांनी दिला आहे.
ग्राहकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, कुठेही भेसळयुक्त किंवा कमी दर्जाचे अन्नपदार्थ विक्री होत असल्याचे आढळल्यास त्वरित प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ वर माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
