सोशल मीडियावरून संपर्क करून घातला तीन लाख रुपयांचा गंडा : कोंढवा पोलिसांकडून गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मुलाला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने एका व्यक्तीची ३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी कोंढवा येथील ५१ वर्षीय नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अतुल नंदा चासकर (रा. भोरवाडी, अवसरी खुर्द, ता. आंबेगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १० जुलै २०२४ पासून आतापर्यंत घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाला बिबवेवाडी-कोंढवा रोडवरील व्हीआयटी कॉलेजमध्ये प्रवेश हवा होता. अतुल चासकर हा अॅडमिशन करून देतो, असे त्यांना सोशल मीडियावरून समजले होते.
त्यावरून त्यांनी अतुल चासकर याच्याशी संपर्क साधला. अतुल चासकर याने कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून २ लाख ९८ हजार ४१० रुपये घेतले. त्यांना व्हीआयटी कॉलेजमध्ये अॅडमिशन झाल्याबाबत बनावट प्रोव्हिजनल अॅडमिशन लेटर दिले.
ते कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना ते पत्र बनावट असल्याचे समजले. त्यांनी त्याच्याकडे पैसे परत मागितले, तेव्हा त्याने टाळाटाळ केली. तो पैसे देत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी आता फिर्याद दिली आहे. हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव करीत आहेत.
