बिबवेवाडीतील घटनेत दोघेजण गंभीर जखमी; खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणाच्या डोळ्यात स्प्रे मारून त्याच्यावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचविण्यास आलेल्या मित्रावरही मारहाण करून त्याच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत तरुणासह त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत अभय रमेश साठे (वय २३, रा. सिद्धार्थनगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साठे व त्यांचा मित्र सचिन अरुण नागटिळक (वय ३७) हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी सोनवणे, जाऊ चव्हाण यांच्यासह ५ ते ६ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बिबवेवाडी येथील सिद्धार्थनगरमध्ये १७ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभय साठे मित्राच्या मुलीच्या वाढदिवसासाठी १७ ऑगस्ट रोजी गेले होते. वाढदिवस साजरा करून ते रात्री दहाच्या सुमारास घरासमोर थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले.
सोनवणे याने त्यांच्या डोळ्यात कसल्यातरी पदार्थाचा स्प्रे मारल्याने त्यांना दिसणे बंद झाले. तेव्हा सोनवणे म्हणाला, “हा आऊ, याला मार” असे बोलून त्यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केला. साठे यांचा मित्र नागटिळक तेथेच थांबला होता.
त्याने हा प्रकार पाहिला आणि साठे यांना वाचविण्यासाठी मध्यस्थी केली. आरोपींनी नागटिळक याला शिवीगाळ करून डोक्यात दगड मारला. त्यानंतर आरोपींनी परिसरात शिवीगाळ व आरडाओरडा करून दहशत माजवली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील करत आहेत.















