टोळक्याने लघु गर्जना संघटनेच्या अध्यक्षावर केला प्राणघातक हल्ला : हडपसरमधील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : “आमच्या इम्तीयाज भाई विरोधात तक्रार करतोस, तुला आता सोडत नाही,” असे म्हणून तरुणावर धारदार शस्त्राने डोक्यात, पाठीवर, छातीवर, पोटावर वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
या घटनेत रामचंद्र तानाजी कांबळे (वय ४०, रा. संगम सोसायटी, जुना म्हाडा कॉलनी, हडपसर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी ससून रुग्णालयात जाऊन फिर्याद घेतली आहे. त्यावरून पोलिसांनी सोनू कांबळे (वय २१), वैभव कांबळे (वय २२), राहुल कांबळे (वय २०, सर्व रा. जुना म्हाडा कॉलनी) या तिघांना अटक केली आहे.
अजय पाडुळे (वय २३, रा. जुना म्हाडा कॉलनी, हडपसर) व इतरांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जुना म्हाडा कॉलनीतील लहुजी वस्ताद जिमजवळ ३१ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचे मित्र राजू परमार याच्यासोबत त्यांच्या घराजवळ गप्पा मारत उभे होते. यावेळी सोनू कांबळे हा त्याच्या साथीदारांना घेऊन आला. त्याने, “माजला का? आमच्या इम्तीयाज भाईच्या विरोधात तक्रार करतोस, तुला आता सोडत नाही,” असे म्हणून धारदार शस्त्राने फिर्यादीच्या हाताच्या पाठीवर, पाठीवर, छातीवर व पोटावर वार केले.
त्यामुळे ते खाली पडले. त्यावेळी इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर ते जागेवरून उठून पळत घरात गेले व दरवाजा लावून घेतला. त्यावर, “आमच्या भाईच्या नादी लागू नकोस, नाहीतर बघतो तुझ्याकडे,” असे म्हणून ते निघून गेले. त्यानंतर कांबळे यांना त्यांच्या नातेवाईकांनी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सहायक पोलीस निरीक्षक उमेश महाडिक तपास करीत आहेत.















