वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी : हद्दपार असतानाही होता फिरत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गणेशोत्सवात परिमंडळ ३ च्या हद्दीतून तडीपार करण्यात आलेल्या सिंहगड रोड व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून वारजे माळवाडी पोलिसांनी त्याच्याकडून गावठी बनावटीची २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
यश विनय शहा (वय २५, रा. देशपांडे गार्डन सोसायटी, नवले इंडस्ट्रिज, नऱ्हे) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. गणेशोत्सवात कोणतेही गंभीर गुन्हे घडू नयेत म्हणून गस्त कडक करण्यात आली होती.
४ सप्टेंबर रोजी पोलीस अंमलदार गणेश शिंदे आणि सत्यजित लोंढे यांना माहिती मिळाली की, सिंहगड रोड व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक गंभीर गुन्हे केलेला यश शहा हा वारजे परिसरात फिरत आहे.
त्याला गणेशोत्सव काळात परिमंडळ ३ च्या हद्दीतून बाहेर निघून जाण्याचे आदेश पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिले होते. असे असतानाही तो पिस्तुल घेऊन फिरत होता. ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला.
तो वारजे पुलाशेजारील नवले पुलाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर येताच पोलिसांनी त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ गावठी पिस्तुल व २ जिवंत काडतुसे मिळाली. अधिक चौकशीत त्याने अजून एक पिस्तुल असल्याची माहिती दिली.
त्यावरून दुसरे पिस्तुलही त्याच्याकडून जप्त करण्यात आले. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे, निलेश बडाख यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार गणेश शिंदे, सत्यजित लोंढे, योगेश वाघ, बालाजी काटे, सागर कुंभार, शरद पोळ, निखील तांगडे, अमित शेलार, अमित जाधव, महादेव शिंदे आणि अमोल सुतकर यांनी केली आहे.
यश शहा याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात २०२० मध्ये मारामारीचा गुन्हा दाखल आहे. तर, सिंहगड रोड पोलीस ठाण्यात २०२०, २०२१ आणि २०२२ मध्ये आर्म्स अॅक्ट, बेकायदा जमाव जमवून हाणामारी करणे, शस्त्र बाळगून गंभीर दुखापत करणे असे तीन गुन्हे दाखल आहेत.
