पर्वती पोलिसांनी तरुणाकडून पिस्तुल व २ जिवंत काडतुसे जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी आपल्यावर हल्ला होईल, या भीतीने गावठी पिस्तुल जवळ बाळगणाऱ्या तरुणाला पर्वती पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
स्वप्निल प्रविण कांबळे (वय २८, रा. शनि मंदिरामागे, दत्तवाडी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. गणेशोत्सवानिमित्त पर्वती पोलीस ठाण्याच्या तपास पथकाकडून पेट्रोलिंग सुरू असताना ४ सप्टेंबर रोजी पोलीस अंमलदार महेश मंडलिक यांना गोपनीय माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून स्वप्निल प्रविण कांबळे याला पकडले. त्याच्याकडून ३५ हजार ४०० रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनीता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक किरण पवार, पोलीस हवालदार प्रकाश मरगजे, पोलीस अंमलदार महेश मंडलिक, श्रीकांत शिंदे, सद्दाम शेख, अमित चिव्हे, अमोल दबडे, मनोज बनसोड, सूर्या जाधव, नानासो खाडे, राकेश सुर्वे आणि धनंजय रौंदळ यांनी केली आहे.
पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले की, स्वप्निल कांबळे याच्याविरुद्ध २०१७ मध्ये मारामारीचा गुन्हा दाखल आहे. त्याचे कात्रज येथे दुकान आहे. त्याने यापूर्वी एका उत्तर भारतीयाला मारहाण केली होती. तो आपल्या साथीदारांसह बदला घेईल, अशी स्वप्निलला भीती वाटत होती. त्यामुळे संरक्षणासाठी पिस्तुल जवळ बाळगले होते, असे तो सांगतो.
