५० टक्के सवलत देणार : १० ते १३ सप्टेंबरपर्यंत मिळणार सवलत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे शहर वाहतूक शाखेकडून दरवर्षी सुमारे १० लाख वाहनचालकांवर जवळपास ९० कोटी रुपयांचा दंड केला जातो. त्यापैकी ६० ते ७० कोटी रुपयांच्या दंडाच्या नोटीसीकडे पुणेकर पूर्णपणे दुर्लक्ष करतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत वाहतूक नियमभंगाच्या दंडाची ४५० कोटी रुपयांची रक्कम थकीत झाली आहे. अशीच परिस्थिती संपूर्ण राज्यात व देशात आहे. त्यामुळे हा दंड वसूल व्हावा यासाठी तडजोडीने दंडात सवलत देण्याची योजना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वाहतूक विभागाने आखली आहे.
त्यानुसार १० ते १३ सप्टेंबर दरम्यान येरवडा येथील वाहतूक शाखेत राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी येऊन आपल्या वाहनांवरील दंडापैकी ५० टक्के दंड भरल्यास वाहनचालकाला ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
पुणे शहरात २०२४ मध्ये तब्बल १० लाख ६३ हजार वाहनांवर ८९ कोटी ९१ लाख रुपयांचा दंड लावण्यात आला होता. त्यापैकी केवळ ३० कोटी १७ लाख रुपयांचा दंड वाहनचालकांनी भरला. २०२४ मध्ये एका वर्षात ५९ कोटी ७३ लाख रुपयांचा दंड थकीत झाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुण्यातील सर्व न्यायालयांमध्ये १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश व पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन, सचिव न्यायाधीश सोनल पाटील, मोटार वाहन न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. पाटील, पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, वाहतूक शाखेचे उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या पुढाकारातून यंदाच्या लोकअदालतीत वाहतूक नियमभंगासाठी आकारलेल्या दंडात्मक ई-चलनाचे दावे तडजोडीने निकाली काढण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
याबाबत पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश सोनल पाटील यांनी सांगितले की, पुणे शहरामध्ये सुमारे ४५० कोटी रुपयांचा वाहतूक दंड थकीत आहे. तडजोडीतून वाहनचालकांना ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
यापूर्वी अशाच प्रकारे २०२३ मध्ये लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात वाहनचालकांना ५० टक्के सवलत देण्यात आली होती. पुणे शहर वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईतील सुमारे ४५० कोटी रुपयांचा दंड थकीत आहे.
हा दंड वसूल व्हावा यासाठी वाहनचालकांनी दंड भरण्याची तयारी दर्शविल्यास त्यांना सवलत देण्यात येणार आहे. त्यासाठी वाहनचालकांनी येरवड्यातील वाहतूक शाखेत संपर्क साधावा, असे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी सांगितले.
वाहतूक विभागाच्या आकडेवारीनुसार २०१९ पासून आतापर्यंत पुणे शहरात ६५ लाख ४० हजार प्रकरणांमध्ये ४५० कोटी रुपयांचा दंड थकीत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये २३ लाख ६६ हजार प्रकरणांमध्ये २११ कोटींचा तर पुणे जिल्ह्यातील ८ लाख ८० हजार प्रकरणांमध्ये ६५ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
खालील वाहतूक नियमभंगाचा दंड सवलतीत भरता येणार आहे :
विनाहेल्मेट दुचाकी चालविणे
सीटबेल्ट न लावता चारचाकी चालविणे
सिग्नल तोडणे
वेगमर्यादा ओलांडणे
चुकीचे पार्किंग
वाहन चालविताना मोबाइलचा वापर
विनापरवाना, विना पीयूसी वाहन चालविणे
फिटनेस प्रमाणपत्र नसणे
चुकीच्या लेनमध्ये वाहन चालविणे
नंबरप्लेट नसणे
खालील गंभीर स्वरूपाच्या वाहतूक नियमभंगांचा दंड माफ होणार नाही :
मद्यपान करून वाहन चालविणे
अपघात करून पळ काढणे
निष्काळजीपणे वाहन चालवून प्राणांतिक अपघातास कारणीभूत होणे
अल्पवयीन मुलाने वाहन चालविणे
अनधिकृत शर्यत
गुन्ह्यांसाठी वाहनांचा वापर
न्यायालयात सुनावणी प्रलंबित असलेली प्रकरणे
अन्य राज्यातील वाहतूक नियमभंगांची चलने















