प्रोग्रेसिव्ह पॅनेलचे ११ तर, उत्कर्ष पॅनलचे ४ उमेदवार विजयी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील प्रतिष्ठेच्या दि. पुना मर्चंट चेंबरच्या 2025-27 या कार्यकाळासाठी झालेली द्विवार्षिक निवडणूक गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी प्रचंड उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभासदांमध्ये यंदाच्या निवडणुकीची विशेष उत्सुकता होती.
या वेळी उत्कर्ष पॅनलकडून पोपटलाल ओसवाल व वालचंद संचेती यांच्या नेतृत्वाखाली १५ उमेदवार रिंगणात उतरले होते, तर प्रोग्रेसिव्ह पॅनलकडून राजेंद्र बाठिया व रायकुमार नहार यांच्या नेतृत्वाखाली १५ उमेदवार रिंगणात होते.
चेंबरला यंदा ७७ वर्षे पूर्ण होत असून, एकूण ५८६ मतदारांपैकी तब्बल ५४४ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यातील केवळ ११ मते बाद झाली. सकाळी ९:४५ वाजता सुरुवात झालेल्या मतदानाची प्रक्रिया दुपारी १:४५ वाजेपर्यंत शांततेत आणि सुरळीतरीत्या पार पडली.
निकालांनुसार प्रोग्रेसिव्ह पॅनलचे तब्बल 11 उमेदवार विजयी झाले, तर उत्कर्ष पॅनलला 4 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे प्रोग्रेसिव्ह पॅनलने चेंबरवर आपली भक्कम पकड सिद्ध केली. ज्येष्ठ व्यापाऱ्यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र ते सफल झाले नाहीत.
तरीदेखील संपूर्ण प्रक्रिया उत्साहात व बंधुभावाच्या वातावरणात झाल्याने सभासदांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.
विजयी उमेदवार – राजेंद्र बाठिया, अजित बोरा, नविन गोयल, रायकुमार नहार, प्रवीण चोरबेले, ईश्वर नहार, आशिष दुगड, उत्तम बाठिया, राजेंद्र गुगळे, सचिन रायसोनी, शाम लड्ढा, विजय मुथा, कन्हैयालाल गुजराती, दिनेश मेहता, अशोक अगरवाल.
राजेंद्र बाठिया यांची विजयी प्रतिक्रिया – “ही विजयाची घडी संपूर्ण प्रोग्रेसिव्ह पॅनलसाठी ऐतिहासिक व प्रेरणादायी आहे. सभासदांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास ही आमची खरी ताकद आहे. व्यापारवृद्धी, पारदर्शकता व सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन चेंबरची नवी दिशा घडवण्याचा आमचा दृढ संकल्प आहे. सर्वांना सोबत घेऊन प्रगतीचा मार्ग प्रशस्त करू,” अशी भावना विजयानंतर राजेंद्र बाठिया यांनी व्यक्त केली.
