स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल : पुण्यातील गुलटेकडीमधील कटारिया केंद्रावरील प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : लोहमार्ग पोलिसांच्या लेखी परीक्षेत इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटचा वापर करण्यास परवानगी नसताना गॅझेटद्वारे कॉपी करणाऱ्या उमेदवाराला पुणे पोलिसांच्या स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. या गॅझेटद्वारे मित्राशी बोलून तो प्रश्न पत्रिकेमधील प्रश्नांचे उत्तर लिहून घेत होता. मुन्नाभाई चित्रपटातील नायक देखील अशा प्रकारे कॉपी करत होता. परंतु खऱ्या आयुष्यातील मुन्नाभाईला जेलची हवा खावी लागणार आहे.
जीवन फंडुसिंग गुणसिंगे (रा. वैजापुर, औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, लोहमार्ग पोलीस भरतीसाठी रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये गुलटेकडी येथील कटारिया हायस्कूलमध्ये असलेल्या केंद्रामध्ये जीवन गुणसिंग याचा नंबर आला होता. दुपारी तो परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा देण्यासाठी गेला. यावेळी तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याने जवळ कोणतीही वस्तू नसल्याचे सांगितले होते.
परीक्षा सुरु झाल्यानंतर गुणसिंग याने इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस द्वारे मित्राला संपर्क साधला. मित्राला प्रश्न सांगून त्याच्याकडून उत्तर घेऊन लिहित होता. उत्तरे लिहित असताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिसांनी गॅझेट जप्त करुन त्याला अटक केली. हे एक इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस असून, त्यामध्ये सिमकार्ड टाकून कॉल करण्याची सोय असून या द्वारे तो कॉपी करत होता.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले करीत आहेत.
















