सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी विनोद माने यांची निवड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
सोलापूर : शासन गावांच्या विकासासाठी व पदाधिकाऱ्यांना स्फूर्ती देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. सरपंच संघटनेच्या माध्यमातून गावे समृद्ध करण्यासाठी व पदाधिकाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करावे, असे आवाहन सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. विकास जाधव यांनी केले.
सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्रच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी कारंबा येथील विनोद काशिनाथ माने यांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी त्यांनी कारंबा ग्रामीण भागात ग्रामपंचायतीचे उपसरपंच तसेच सोसायटीचे चेअरमन म्हणून ग्रामपंचायत सक्षम करण्यासाठी उत्तम कार्य केलेले आहे.
या कार्यक्रमाला कारंब्याचे सरपंच तुकाराम चव्हाण, गुळवंची सरपंच सुनील जाधव, नरोटेवाडी सरपंच उमेश भगत, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब पाटील, नान्नजच्या अमृता पाटील, माजी सरपंच दत्तात्रय पवार, माजी उपसरपंच चंद्रकांत मस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री समृद्ध गाव पंचायतराज अभियान 17 सप्टेंबरपासून सुरू झाले असून गावे समृद्ध करण्यासाठी या मोहिमेत सरपंच संघटनेने सहकार्य करावे, असे आवाहन ॲड. विकास जाधव यांनी यावेळी केले. तसेच नूतन सरचिटणीस विनोद माने यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
