शहराच्या मध्य भागातील ४३ गुन्हेगारांची कारागृहात रवानगी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : नवरात्र महोत्सवात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
परिमंडळ १ मधील फरासखाना, विश्रामबाग, समर्थ, खडक, डेक्कन, शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या परिसरातील ४३ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
ही कारवाई एकाच दिवसात पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी केली. कारवाई करण्यात आलेल्या सराईतांविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगणे, बेकायदा दारू विक्री, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी काही जण गुंड टोळ्यांशी संबंधित असल्याची माहिती पोलीस उपायुक्त रावले यांनी दिली.
गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी ५ सप्टेंबर रोजी नाना पेठेत टोळीयुद्धातून आंदेकर टोळीने आयुष कोमकर याचा खून केला होता. त्यानंतर कोथरूड भागात नीलेश घायवळ टोळीतील सराईतांनी एका व्यक्तीवर पिस्तुलातून गोळीबार केला तसेच या भागात दहशत माजविण्यासाठी एका तरुणावर कोयत्याने वार केले होते.
या पार्श्वभूमीवर नवरात्र महोत्सवाच्या काळात पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली आहे.
