शिकवणीसाठी घरी येणाऱ्या मुलीवर २ ते ३ महिने केला अत्याचार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पूजा सांगणारा पुजारी सायंकाळनंतर मुलांचे क्लास घेत असे. या क्लासला येणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या क्लास शिक्षकाला न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
संजय रमेश शर्मा (वय ५६, रा. राधिका एम्पायर, जगतापनगर, वानवडी) असे या नराधमाचे नाव आहे. ही घटना ३ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२१ दरम्यान आरोपीच्या घरी घडली होती.
संजय शर्मा हा दिवसभर पुजारी म्हणून काम करत होता आणि सायंकाळी मुलांचे क्लास घेत असे.
ही अल्पवयीन मुलगी संजय शर्मा याच्याकडे शिकवणीसाठी जात होती. त्याने तिला बेडरूममध्ये घेऊन जाऊन, तिच्या बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर तिने आईला ही बाब सांगितली.
त्यानंतर त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक सुधा चौधरी यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्यात सरकारी वकील नितीन कोंघे यांनी चार साक्षीदार तपासले.
त्यात स्वतः पीडिता, तपास अधिकारी आणि मेडिकल अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. आरोपीनेही स्वतःच्या बचावासाठी चार साक्षीदार तपासले. त्यात आरोपी स्वतः, त्याची बहीण, त्याचा मुलगा आणि सोसायटीतील एक रहिवासी यांच्या साक्षी घेण्यात आल्या.
जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी संजय रमेश शर्मा याला पोस्को कायद्यानुसार २० वर्षे सक्तमजुरी आणि ३७ हजार रुपयांचा दंड, तसेच दंड न भरल्यास ९ महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली.
या खटल्यामध्ये पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी पर्यवेक्षण केले. वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयराव डोके यांनी प्रभारी अधिकारी म्हणून, तर कोर्ट पैरवीसाठी दिनेश जाधव यांनी काम पाहिले.
