महाराष्ट्र न्युज नेटवर्क
सोलापूर : शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत उपवासाचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. मात्र अशा वेळी भगरसह इतर उपवासाचे पदार्थ खरेदी आणि सेवन करताना विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन, सोलापूर यांनी केले आहे.
अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, उपवासाचे पदार्थ योग्य पद्धतीने तयार करून आणि योग्य ती काळजी घेऊन खाल्ले, तर आरोग्याची हानी टाळता येते. नागरिकांनी या सूचना काटेकोरपणे पाळून आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपवासाचे अन्नपदार्थ खाताना नागरिकांनी खालील बाबींची दक्षता घ्यावी :
भगर व इतर पदार्थ नेहमी प्रमाणित आणि स्वच्छ ठिकाणावरूनच खरेदी करावेत.
उघड्यावर विकल्या जाणाऱ्या पदार्थांचा वापर टाळावा.
पॅकेटबंद वस्तू खरेदी करताना उत्पादकाचे नाव, पत्ता, बॅच नंबर, पॅकिंग दिनांक व एक्सपायरी दिनांक तपासावा.
भगर खरेदी करताना त्यात दगड, माती किंवा कचऱ्याची अशुद्धी नाही याची खात्री करावी.
बाजारातून आणलेली भगर व्यवस्थित धुऊन घरच्या घरी पीठ करून वापरावी.
उपवासाचे पदार्थ नेहमी स्वच्छ पाणी व स्वच्छ भांड्यात तयार करावेत.
फळे खाताना ती स्वच्छ धुऊनच सेवन करावीत.
तळलेले पदार्थ तयार करताना वारंवार वापरलेले तेल वापरणे टाळावे.
