२६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान देशभर सीपीआर व एईडी प्रशिक्षण उपक्रम
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : भारत अधिक ‘कार्डियाक-सेफ’ बनावा या उद्देशाने रिवाइव्ह हार्ट फाउंडेशन (RHF) तर्फे राष्ट्रीय हृदयविकार झटका जनजागृती अभियान २०२५ ची सुरुवात २६ सप्टेंबर रोजी पुण्यात करण्यात आली. आरोग्य मानसशास्त्रज्ञ आणि राष्ट्रीय संयोजक डॉ. किन्जल गोयल यांच्या नेतृत्वाखाली ३ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशभर हे अभियान राबवले जाणार आहे.
पुण्यातील सिम्बायोसिस विश्व भवन येथे झालेल्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर होते. मान्यवरांमध्ये डॉ. वावरे (PMC मेडिकल ऑफिसर), पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, सिम्बायोसिस प्रमुख डॉ. राजीव येरेवडेकर आणि कोहिनूर समूहाचे चेअरमन कृष्णकुमार गोयल यांचा समावेश होता.
या अभियानाचे प्रायोजक कोहिनूर समूह असून सिम्बायोसिस आरोग्य भागीदार म्हणून जोडले गेले आहे. गेल्या चार वर्षांपासून पुणे मोहिमेत रोटरी लक्ष्मी रोडचा मोठा सहभाग राहिला आहे. यंदाच्या पुणे उपक्रमाचे नेतृत्व आघाडीचे हृदयविकार तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ व डॉ. सुनील साठे यांनी केले, तर डॉ. किन्जल गोयल यांनी केंद्रीय संयोजक म्हणून राष्ट्रीय पातळीवर या अभियानाला गती दिली आहे.
या मोहिमेत नागरिकांना हँड्स-ओन्ली सीपीआरसारख्या जीवनरक्षक तंत्रांचे प्रशिक्षण देणे आणि सार्वजनिक ठिकाणी ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) चा वापर याबाबत जनजागृती करणे हे उद्दिष्ट आहे.
यावर्षी विशेष भर महाविद्यालयीन व विद्यापीठीन विद्यार्थ्यांवर देण्यात आला आहे, जेणेकरून तरुण पिढी आत्मविश्वासाने ‘फर्स्ट रिस्पॉन्डर्स’ म्हणून पुढे येऊ शकेल. देशभरातील शैक्षणिक संस्था, सार्वजनिक ठिकाणे आणि निवासी सोसायट्यांमध्ये मोफत प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात येत आहेत.
राष्ट्रीय समन्वयक म्हणून डॉ. किन्जल गोयल यांच्यासोबत लखनौचे वरिष्ठ हृदयविकार तज्ज्ञ डॉ. आदित्य कपूर कार्यरत आहेत. अभिनेत्री अनन्या पांडे यंदाच्या अभियानाची ब्रँड अॅम्बेसेडर असून त्या देशभरातील जागरूकता वाढविण्यासाठी योगदान देत आहेत.
प्रख्यात तज्ज्ञ डॉ. यश लोखंडवाला, डॉ. ब्रायन पिंटो आणि डॉ. मञ्जु सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम चालू असून देशभरातील १०० हून अधिक वैद्यकीय स्वयंसेवक यासाठी कार्यरत आहेत.
२०१७ पासून या फाउंडेशनने देशभरातील पोलीस दल, शिक्षण, परिवहन आणि नागरी समाजातील १५ लाखांहून अधिक नागरिकांना सीपीआर प्रशिक्षण दिले आहे. समाजाच्या सक्रिय सहभागातून भारताला कार्डियाक-सेफ बनविण्याकडे ठोस पावले टाकली जात आहेत.
