गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकची कामगिरी : सोलापूर जिल्ह्यात जाऊन आवळल्या मुसक्या
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
पुणे : मोक्कातील फरार आरोपी जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकला यश मिळाले असून, सोलापूर जिल्ह्यात जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
खंडणी विरोधी पथक एक, गुन्हे शाखा, पुणे शहर पथकातील अधिकारी सहपोलीस निरीक्षक संदीप बुवा व त्यांचा स्टाफ असे मिळून रेकॉर्डवरील पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार, राजेंद्र लांडगे यांना वारजे पोलीस ठाण्यातील मोक्का या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी चेतन चंद्रकांत पवार, (वय २७, रा. मेगा सिटी, एसएनडीटी कॉलेज जवळ, पौड फाटा, कर्वे रोड, पुणे) हा त्याची ओळख लपवून ता. करमाळा, जि. सोलापूर या ठिकाणी राहत असल्याची माहिती त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली होती.
याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांचे सुचनेप्रमाणे खंडणी विरोधी पथक एककडील अधिकारी व अंमलदार यांचे पथक रवाना करण्यात आले होते. सदरचा आरोपी अर्जुननगर (ता. करमाळा जि. सोलापूर) परिसरात राहत असून कमलाई स्नॅक्स सेंटर, कुर्डवाडी रोड, मौजे. पांडे, ता. करमाळा, जि. सोलापूर येथे रोज सकाळी नाश्ता करणेसाठी येत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती.
कमलाई स्नॅक्स सेंटर, कुर्डवाडी रोड, मौजे पांडे, ता. करमाळा या ठिकाणी सापळा रचून पाहिजे आरोपी चेतन चंद्रकांत पवार यास दिनांक १७ ऑक्टोबर रोजी शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचेकडे तपास केला असता त्याने त्याचे साथीदार नकुल श्याम खाडे, अभिजित तुकाराम येळवंडे, उमेश चिकणे यांच्यासह रवींद्र सखाराम तांगुडे यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर गोळीबार केल्याबाबत कबुली दिलेली आहे.
आरोपी चेतन पवार याने वर नमुद गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास पुढील तपासकामी वारजे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त ( गुन्हे २), लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांच्या सूचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस अंमलदार नितीन कांबळे, राजेंद्र लांडगे, विवेक जाधव, नितीन रावळ यांनी केली आहे.
