खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला वानवडी पोलिसांची वैजापूर येथून अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : रिक्षातील टेपचा आवाज कमी न केल्याच्या वादातून हडपसरमधील शिंदेवस्ती येथे रिक्षाचालकावर हत्याराने प्राणघातक हल्ला करणारा आणि गेल्या तीन महिन्यांपासून फरार असलेला गुन्हेगार ऋषिकेश बागुल याला वानवडी पोलिसांनी वैजापूर येथून अटक केली आहे.
ऋषिकेश सुनील बागुल (वय २७, रा. एसआरए बिल्डिंग, शिंदेवस्ती, हडपसर) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चार, तसेच फरासखाना, हडपसर आणि खडक पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत.
४ जुलै २०२५ रोजी फिर्यादी काकासाहेब रामचंद्र शिरोळे (वय ४६, रा. कसबा पेठ) हे नातेवाईकांसह शिंदेवस्ती येथील एसआरए बिल्डिंगजवळ रिक्षात थांबले होते. त्यावेळी आरोपी दादा क्षीरसागर याने टेप बंद करण्यास सांगितले. शिरोळे यांनी टेपचा आवाज कमी असल्याचे सांगितल्यावर क्षीरसागर याने शिवीगाळ केली.
त्यानंतर ऋषिकेश बागुलने हातातील हत्याराने शिरोळे यांच्या डोक्यात प्रहार केला. इतर साथीदारांनी दांडक्याने व फरशीने मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. त्या दिवसापासून ऋषिकेश बागुल फरार होता.
तपास पथकातील पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्य करत आहे. त्यानुसार पोलिसांनी वैजापूर बस डेपोजवळ सापळा रचून बागुलला जेरबंद केले. ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांच्या सूचनेप्रमाणे करण्यात आली.
यात सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, यतीन भोसले, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, विष्णु सुतार, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे, अभिजित चव्हाण, विठ्ठल चोरमले आणि अर्शद सय्यद यांनी सहभाग घेतला.
