वर्षभरात ४४जणांना मोक्का : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा आदेश
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरविणारा सराईत गुन्हेगार पृथ्वीराज कांबळे याच्यावर पुणे पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धेचे आदेश दिले आहेत. मागील एक वर्षात पोलीस आयुक्तांनी एमपीडीए अंतर्गत केलेली ही 44 वी कारवाई आहे.
पृथ्वीराज कांबळे (वय-29 रा. मंगळवार पेठ, पुणे) हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी कट्टा, कोयता, लोखंडी सळई, सुरा, लाकडी दांडके या सारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दुखापत, दरोड्याचा प्रयत्न, दंगा, सरकारी नोकरावर हल्ला, बेकायदा हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्याविरुद्ध सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कृत्यामुळे नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली असून तक्रारीसाठी कोणी पुढे येत नव्हते.
फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी सराईत गुन्हेगार पृथ्वीराज कांबळे याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे सादर केला होता. पोलीस आयुक्तांनी प्रस्तावाची पडताळणी करुन कांबळे याच्या विरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी केले.
वर्षभरात 44 जण स्थानबद्ध….
गेल्या वर्षभरात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आतापर्यंत 44 गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यान्ये स्थानबद्ध केले आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.
