खडक पोलिसांची मध्यरात्री कारवाई : स्वारगेटजवळ दोघांना अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मॅफेड्रॉनची विक्री करण्याच्या उद्देशाने मध्यरात्री कोणाची तरी वाट पाहत थांबलेल्या दोघांना खडक पोलिसांनी स्वारगेटजवळील स्वामी मंदिर परिसरातून रंगेहात पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल १ लाख २३ हजार ६०० रुपयांचा मेफेड्रॉन (एम.डी.) आणि एक कोयता जप्त केला आहे.
अटक केलेल्यांची नावे अब्दुल अकबर खान (वय १९, रा. पर्वती, दत्तवाडी) आणि धीरज उर्फ गुड्डू नीलेश कदम (वय १९, रा. जनता वसाहत, दत्तवाडी) अशी आहेत. या प्रकरणी पोलीस अंमलदार आशिष चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शुक्रवारी मध्यरात्री अंमलदार आशिष चव्हाण आणि इरफान नदाफ हे शिवाजी रोडवरून स्वारगेटकडे गस्त घालत होते. रात्री सुमारास स्वामी मंदिराजवळ ते पोहचले असता रस्त्याच्या कडेला दोन तरुण उभे असल्याचे त्यांना दिसले.
त्यापैकी एकाच्या हातातील कॅरी बॅग पाहताच तो पोलिसांना पाहून घाबरला आणि बॅग लपवण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आणि तात्काळ पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांना माहिती दिली.
लोंढे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. झडतीदरम्यान अब्दुल खान याच्याकडून सुमारे ६ ग्रॅम मॅफेड्रॉन, किंमत १ लाख २३ हजार ६०० रुपये, असा साठा आढळून आला. तर धीरज कदम यांच्या ताब्यातून एक कोयता जप्त करण्यात आला. दोघांनाही अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत बोराडे करत आहेत.
















