खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात होता दीड वर्षे फरार : खडक पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : घरफोडी, दुखापत करणे आणि खुनाचा प्रयत्न करणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असलेला सराईत गुन्हेगार नाव बदलून दीड वर्षांपासून कोंढव्यात राहत होता. फरार असलेल्या या आरोपीस खडक पोलिसांनी कोंढव्यातून अटक केली आहे.
आझिम उर्फ पल्ला सलीम शेख (वय २४, रा. लोहियानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आझिम शेख याच्यावर गेल्या वर्षी एका व्यक्तीच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा खडक पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, घरफोडी आणि दुखापत अशा स्वरूपाचे एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, खडक पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार आशिष चव्हाण आणि इरफान नदाफ यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आझिम शेख हा नाव बदलून कोंढव्यात राहत आहे. त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांना दिली.
यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कोंढव्यामध्ये सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावल आणि सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शर्मिला सुतार, मनोजकुमार लोंढे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, तसेच पोलीस अंमलदार आशिष चव्हाण व इरफान नदाफ यांनी केली आहे.

















