सय्यदनगरमधील घटना : खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पूर्व वैमनस्यातून सय्यदनगर परिसरात दोन फळ विक्रेत्या भावांवर टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून, काळेपडळ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना २६ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारास ८ वाजता सय्यदनगर येथील गोदामात घडली.
जखमींची नावे हुसेन मुस्तफा कादरी (वय २७, रा. हांडेवाडी रोड) आणि त्यांचा भाऊ शब्बीर कादरी अशी आहेत. पोलिसांनी अमजद अफजल शेख (वय ४५, रा. सय्यदनगर, महमदवाडी) याला अटक केली असून, अकबर अफजल शेख (४०), आयान अमजद शेख (२२), मदतसर सलीम शेख (२८), मजहर काजी (२८), अशपाक अफजल शेख (२८), जावेद बागवान (सर्व रा. सय्यदनगर, महमदवाडी) व इतरांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसेन कादरी हे होलसेल फळ विक्रेते आहेत. फिर्यादी आणि आरोपी यांच्यात यापूर्वीही भांडणे झाली होती. घटनेच्या दिवशी हुसेन हे रात्री गोदामात पायी जात होते. वाटेत अमजद शेख थांबलेला होता. त्याने “तू मेरे तरफ क्यों देखा?” असे म्हणत हुसेन यांच्याशी वाद घातला.
दरम्यान, शब्बीर कादरी तेथे आला आणि “भांडण नको” असे म्हणत दोघे भाऊ गोदामात गेले. काही वेळाने बाहेर गर्दी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दरवाजा लावण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी अमजद याने हुसेन यांच्या हातावर वार केला.
दोघे भाऊ मागील दरवाजातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना टोळक्याने त्यांना गाठले आणि लाठ्या, काठ्या व लोखंडी हत्यारांनी बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार करत आहेत.

















