मुलीला चोरीचा संशय : धनकवडीतील शंकर महाराज वसाहतीतील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : धनकवडीतील शंकर महाराज वसाहतीतील घरात ७५ वर्षीय महिला मृतावस्थेत आढळून आल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नसून, डॉक्टरांनी व्हिसेरा तपासणीसाठी राखून ठेवला आहे.
मृत महिलेचे नाव कुसुम पन्हाळे (वय ७५, रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी, पुणे-सातारा रोड) असे आहे. त्यांच्या अंगावरील साडेतीन तोळ्यांची सोन्याची मोहनमाळ आणि घरात ठेवलेली २० ते २५ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचा संशय त्यांच्या मुलीने व्यक्त केला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसुम पन्हाळे या फुलांचा व्यवसाय करत होत्या आणि त्या घरात एकट्याच राहत होत्या. गेल्या दोन दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि काल दिवसभर त्यांनी काही खाल्ले नव्हते.
शुक्रवारी सकाळी त्यांचा नेहमीचा आवाज न आल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा ढकलून पाहिला असता, दरवाजा उघडाच असल्याचे दिसले. आत पन्हाळे झोपलेल्या अवस्थेत दिसल्या, त्यामुळे शेजाऱ्यांनी प्रथम काहीच संशय घेतला नाही. मात्र, बराच वेळ गेला तरी त्या न उठल्याने त्यांनी त्यांच्या मुलीला फोन करून बोलावले.
यानंतर मुलगी व नातू घरात आले आणि परिस्थिती पाहून त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पन्हाळे यांना ससून रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
शहर पोलिसांच्या आयकार आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली, परंतु कोणतेही संशयास्पद पुरावे आढळले नाहीत. मृत महिलेची विवाहित मुलगी धनकवडीतील बालाजीनगर येथे राहते. तिने सांगितले की, आईच्या गळ्यात साडेतीन तोळ्यांची सोन्याची मोहनमाळ होती, जी आता दिसत नाही, तसेच घरातील २० ते २५ हजार रुपयांची रोकडही गायब आहे.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात पन्हाळे २९ ऑक्टोबर रोजी बाहेर पडताना दिसतात. मात्र, त्यांनी गळ्याभोवती पांढरा कपडा बांधलेला असल्याने त्या वेळी मोहनमाळ होती की नाही, हे स्पष्ट झालेले नाही.
व्हिसेरा तपासणीचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार करत आहेत.















