आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अल्पवयीन गुंडांचा कारमालकावर प्राणघातक हल्ला

Spread the love

पुणे : कॅफेबाहेर उभ्या असलेल्या कारला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी धडक दिली. त्यानंतर कारमालक तरुणावर कोयत्याने वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत दहशत निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या घटनेत अक्षय दत्तात्रय बांदल (वय २६, रा. विश्व हाइट्स, सिद्धिविनायक सोसायटी, आंबेगाव) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आंबेगाव पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची फिर्याद घेतली आहे. त्यावरून पोलिसांनी मृणाल दीपक जाधव (वय १९, रा. राज टॉवर, भाजी मंडई, कात्रज) याला अटक केली आहे.

त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पुणे–बंगलोर महामार्गावरील आंबेगाव येथील सीसीडी कॅफेसमोर २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय बांदल हे त्यांचा भाऊ आकाश बांदल, ओंकार बांदल, मित्र सार्थक वाल्हेकर आणि अमन भाटिया यांच्यासोबत घरी क्रिकेट सामना पाहत होते. त्यानंतर ते कारने सीसीडी कॅफेत कॉफी पिण्यासाठी गेले.

कॉफी पिऊन झाल्यावर बाहेर येऊन कारच्या मागे उभे राहून गप्पा मारत असताना, कारच्या पुढील बोनटला कोणीतरी धडकल्याचा आवाज आला. त्यांनी पुढे जाऊन पाहिले असता, एका मोपेडने कारच्या बोनटला धडक दिली होती.

मोपेडवरील तिघे खाली पडले. यावेळी एका अल्पवयीन मुलाने कमरेतून कोयता काढून “याला आज जिवंत सोडायचं नाही” असं म्हणत अक्षय यांच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर मृणाल जाधव याने त्याच्याकडील कोयत्याने अक्षय बांदल यांच्या डाव्या हाताच्या पंजावर वार केला.

दुसऱ्या अल्पवयीन मुलाने त्याच्याकडील कोयत्याने उजव्या हाताच्या मनगटावर, पाठीवर आणि डाव्या पायाच्या पंजावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यांना वाचविण्यासाठी मित्र पुढे सरसावले असता, या तिघांनी हवेत कोयते फिरवून “आम्ही इथले भाई आहोत, कुणी आमच्या नादी लागू नका” असे म्हणत दहशत पसरवली आणि ते पळून गेले. अक्षय बांदल यांना भाऊ व मित्रांनी भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सहायक पोलीस निरीक्षक मुलाणी तपास करीत आहेत.