मिठाई दुकानदाराची बदनामी : तोतया पत्रकारासह चौघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मिठाई दुकानातून मिठाई न घेतल्यानेसुद्धा ‘तुमच्या मिठाईमध्ये आळ्या निघाल्या’ असे सांगून मॅनेजरला मारहाण केली. दुकानाची बदनामी करणारा व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकला. तो व्हिडिओ डिलिट करण्यासाठी तोतया यूट्यूब पत्रकाराने १ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.
राहुल मच्छिंद्र हरपळे (रा. फुरसुंगी), माऊली चव्हाण (रा. फुरसुंगी) आणि त्यांचे दोन साथीदार यांच्याविरुद्ध फुरसुंगी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत खिमसिंह ओमसिंह राजपुरोहित (वय ४२, रा. राधाकृष्ण कॉम्प्लेक्स, फुरसुंगी) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार भेकराईनगर येथील पुरोहित स्वीट कॉर्नर आणि पुरोहित स्वीट मार्ट येथे १७ व १८ नोव्हेंबर २०२५ रोजी घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी येथील पुरोहित स्वीट मार्ट दुकानात दोघे जण आले. त्यांनी मॅनेजर नगराम देवासी यांना ‘‘तुमच्या काजू मसाल्यामध्ये आळ्या मिळाल्या’’ असे सांगून ‘‘मी व्हिडिओ चालू करतो, तेव्हा तू बोलायचे की मसाला काजू हे आमच्या दुकानातील आहेत आणि आमची चूक झाली, मग आम्ही निघून जातो’’ असे सांगितले.
मसाला काजू हे आमच्या दुकानातील नाहीत, असे मॅनेजरांनी सांगून तसे बोलण्यास नकार दिल्यावर त्यांनी मॅनेजरांच्या भावाला मारहाण केली. त्यानंतर घाबरून मॅनेजर नगराम यांनी त्या दोघांनी सांगितले तसे बोलले.
यानंतर सायंकाळी ५ वाजता राहुल हरपळे दुकानात आला. ‘‘मी न्यूज प्रहारचा पत्रकार आहे. माझा ‘न्यूज प्रहार’ नावाचा यूट्यूब चॅनेल आहे. तुमच्या दुकानातील मसाला काजूमध्ये आळ्या असल्याबाबतचा व्हिडिओ माझ्याकडे आहे.
हा व्हिडिओ माझ्या न्यूज प्रहार चॅनेलच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर टाकून तुमची बदनामी करतो. तसे नको असेल तर मला ५० हजार रुपये द्या’’, अशी खंडणी त्याने फिर्यादींकडे मागितली. फिर्यादी यांनी ‘‘हे मसाला काजू आमच्या दुकानातील नाहीत. तुम्ही कोणत्याही चॅनेलवर व्हिडिओ टाका, आम्हाला काही फरक पडत नाही’’ असे सांगितल्यावर तो चिडून निघून गेला.
त्यानंतर त्याचा ओळखीचा माऊली चव्हाण यांनी फिर्यादींना शिवशक्ती चौकात भेटायला बोलावले. तेथे माऊली चव्हाण यांनी ‘‘तुम्ही न्यूज चॅनेलचे मिटवून घ्या’’ असे सांगितले. ‘‘काय मिटवायचे?’’ असे विचारल्यावर राहुल हरपळे म्हणाला की ‘‘माझ्या प्रहार न्यूज चॅनेलच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तुमच्या दुकानाचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि आतापर्यंत दीड लाख लोकांनी तो पाहिला आहे. तुमच्या दुकानाची बदनामी होत आहे आणि तुमचे दुकान बंद होईल.’’
यावर फिर्यादींनी ‘‘व्हिडिओ डिलिट करून टाका’’ असे सांगितल्यावर राहुल हरपळे म्हणाला, ‘‘१ लाख रुपये द्या, नाहीतर येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. मला आत्ता १ लाख रुपये द्या, ऑफिसला फोन करून व्हिडिओ डिलिट करायला सांगतो.’’
फिर्यादींनी ‘‘थोडा वेळ द्या’’ असे सांगितल्यावर तो म्हणाला, ‘‘तुम्ही पोलिस स्टेशनमध्ये गेलात तर तुम्हाला मार्केटमध्ये रोज फिरावे लागते, विचार करा. तुम्ही बाहेरील राज्यातील आहात, नीट राहा, नाहीतर बघून घेऊ,’’ अशी धमकी दिली. फुरसुंगी पोलीस राहुल हरपळे याचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख तपास करीत आहेत.
राहुल हरपळे याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल
फिर्यादी खिमसिंह राजपुरोहित यांनी त्यांच्या व्यावसायिक ओळखीच्या लोकांकडून माहिती घेतली असता असे समजले की राहुल हरपळे यांनी हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर येथील व्यावसायिकांकडून खंडणी घेतली असून त्याबाबत त्याच्याविरुद्ध हडपसर व लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यूट्यूब चॅनेलचा पत्रकार असल्याचे सांगणारा राहुल मच्छिंद्र हरपळे आणि त्याची पत्नी यांनी लॉकडाऊनदरम्यान हातभट्टी दारूचा साठा करून त्याची विक्री केल्याची माहिती हडपसर पोलिसांना मिळाली होती. छाप्यामध्ये पोलिसांनी १२ हजार ७०० रुपयांची हातभट्टी दारूची कॅन जप्त केली होती.
















