बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : बिबवेवाडीतील २ आणि जेजुरीतील १ गुन्हा उघडकीस
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : चोरीची दुचाकी घेऊन थांबलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून बिबवेवाडी पोलिसांनी ६ मोबाईल आणि ३ दुचाकी असा १ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. त्याच्याकडून एकूण ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
बाळु प्रभाकर चव्हाण (वय ३८, रा. सदाशिव चाळ, कांदा मार्केट, जुन्नर एस.टी. स्टँडसमोर) असे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव आहे. मौजमजेसाठी आणि पैशांसाठी त्याने दुचाकी चोरल्याचे त्याने सांगितले.
बिबवेवाडी येथून एक दुचाकी चोरीला गेली होती. याबाबत तपास करत असताना पोलीस अंमलदार आशिष गायकवाड आणि विशाल जाधव यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, १६ एकर मोकळ्या मैदानात एक जण चोरीची गाडी घेऊन थांबला आहे.
या माहितीची खात्री करून पोलिसांनी तेथे जाऊन बाळु चव्हाण याला पकडले. त्याच्याकडील गाडीची चौकशी केल्यावर ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशी केल्यावर त्याने बिबवेवाडी येथील पोकळे वस्तीतील घरात घरफोडी करून ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण आणि २ अंगठ्या चोरल्याचे निष्पन्न झाले.
याशिवाय, जेजुरी येथून दोन मोटारसायकली आणि १० मोबाईल चोरल्याचेही उघडकीस आले आहे. त्याच्याकडून या ३ गुन्ह्यांतील ३ दुचाकी आणि ६ मोबाईल असा १ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अमोल माने, पोलीस अंमलदार संजय गायकवाड, विनोद जाधव, संजय आग्रे, आशिष गायकवाड, विशाल जाधव, सुमित ताकपिरे, ज्योतिष काळे, शिवाजी येवले, रक्षित काळे, संतोष बनसुडे, दत्ता शेंद्रे आणि राहुल खाडे यांनी केली आहे.
















