अंमली पदार्थ विरोधी पथकाची थेऊर येथे कारवाई; दीड कोटींचा माल जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : थेऊर येथील शेतात असलेल्या एका गोदामावर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून बनावट आरएमडी गुटखा व विमल गुटखा तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे.
या कारखान्यातून बनावट सुपारी, सुगंधित तंबाखू, थंडक, केमिकल, गुलाबपाणी, प्रिंटेड पाऊच, बॉक्स व पोती असा सुमारे १ कोटी रुपयांचा माल जप्त केला आहे. तसेच बनावट गुटखा वाहतूक करण्यासाठी मॉडिफाय करण्यात आलेल्या ३ कार अशा ५० लाखांच्या वाहनांसह मिळून आले आहेत. तसेच रोख रक्कम १ लाख ३० हजार रुपये जप्त करण्यात आली आहे.
बनावट गुटखा तयार करणाऱ्या कंपनीचे मालक रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता (वय २५, रा. काळुबाई मंदिराजवळ, पत्र वस्ती, थेऊर) व कामगार रामप्रसाद उर्फ बापू बसंता प्रजापती (वय २५, रा. थेऊर गाव), अप्पु सुशिल सोनकर (वय ४६, रा. कांबळे वस्ती, थेऊर फाटा), दानिश मुसाकीन खान (वय १८, रा. थेऊर फाटा, मूळ रा. उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेतले आहे. सुमित गुप्ता हा फरार झाला आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड व त्यांचे सहकारी हे अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवत असताना गुरुवारी पहाटे ५ वाजता त्यांनी थेऊर येथील सुमित गुप्ता यांच्या गोदामावर छापा टाकला.
तेथे बनावट आरएमडी गुटख्याची सुगंधित तंबाखू व विमल गुटखा (पान मसाला) तयार करण्यात येत असल्याचे दिसून आले. तसेच गोदामाच्या बाजूस शेतामध्ये बनावट गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल ठेवण्यात आला होता.
पोलिसांनी सुमारे १ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा कच्चा माल आणि ५० लाखांच्या तीन आलिशान कार जप्त केल्या आहेत. बनावट गुटखा तयार करणारे कंपनीचे मालक व तिघे कामगार यांना ताब्यात घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड, तसेच पोलीस अंमलदार राजस शेख, संदीप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय खरपुडे, संदीप देवकाते, गणेश गोसावी, देविदास वांढरे, शुभांगी म्हाळसेकर, दिनेश बारटेवाड यांनी केली आहे.















