आरोपीच्या साथीदाराला अव्यवहार्य फोन केल्याने अमोल गायकवाड झाला होता पसार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्धिकी यांच्या हत्येमध्ये सहभागी आरोपीला पकडण्यासाठी पंजाब पोलिसांना सहाय्य करताना, त्याच्या साथीदाराला अव्यवहार्य पद्धतीने फोन केल्याने आरोपी सावध होऊन पळून गेला. त्यामुळे आरोपीला अटक करण्यात विलंब झाला. आरोपीशी संशयास्पद संपर्क साधल्यामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेबद्दल अविश्वास निर्माण झाल्याने पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी गुन्हे शाखेच्या युनिट ६ मधील पोलीस हवालदाराला निलंबित केले आहे.
निलंबित हवालदाराचे नाव सचिन दिलीप पवार असे असून ते गुन्हे शाखा युनिट ६ मध्ये कार्यरत होते. काँग्रेस नेते बाबा सिद्धिकी यांची गेल्या वर्षी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्विकारली होती.
या गँगचा संबंध आल्याने पंजाब पोलीसही या प्रकरणाचा तपास करीत होते. बिश्नोई गँगने पंजाबातील एका गारमेंट व्यावसायिकाची हत्या केली होती आणि त्यातील आरोपींशी अमोल गायकवाड संपर्कात होता. तसेच त्यांना आश्रय दिल्याची माहिती पंजाब पोलिसांना मिळाली होती.
अमोल गायकवाड याचा शोध घेण्यासाठी पंजाब पोलीस पुण्यात आले होते तसेच त्यांच्या मदतीसाठी गुन्हे शाखा युनिट ६ चे पथक जोडण्यात आले होते. गायकवाडचे लोकेशन मिळवण्यासाठी पंजाब पोलिसांनी हवालदार सचिन पवार यांना गायकवाडच्या साथीदाराशी फोनवर गोड बोलून गायकवाडला बोलावून घेण्यास सांगितले.
त्यानुसार पवार यांनी वरिष्ठांच्या सांगण्यानुसार फोन केला. मात्र त्यामुळे अमोल गायकवाड सावध झाला. त्याने मोबाईल फोन बंद केला आणि घराकडे न जाता विविध ठिकाणी फिरत राहिला. त्यानंतर कोल्हापूरमध्ये त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
चौकशीत गायकवाडने, फोन आल्याने मी सावध झालो व मोबाईल बंद करून पळून गेलो, असे कबूल केले. या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्त तसेच कायदा व सुव्यवस्थेचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी अहवाल पुणे पोलिसांना पाठविला होता.
आरोपीशी अव्यवहार्य व संशयास्पद संपर्क साधल्याने आरोपी पसार झाला, त्यामुळे त्याला अटक करण्यात विलंब झाला. यामुळे शासकीय यंत्रणेचा अनावश्यक वापर होऊन वेळेचा अपव्यय झाला आणि पोलीस दलाच्या प्रतिमेला तडा गेला. त्यामुळे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी पोलीस हवालदार सचिन दिलीप पवार यांना निलंबित केले आहे.















