हडपसर पोलिसांनी वाहनचोरीचे ४ गुन्हे उघडकीस : अल्पवयीन मुलाकडून एक दुचाकी जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शहरात सर्वाधिक वाहनचोरीच्या घटना हडपसर परिसरात आढळून येतात. या वाहनचोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाला आदेश देण्यात आले होते. तपास पथकाने बार्शी, तुळजापूर, लातूर परिसरात शोध घेऊन एका वाहनचोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून ४ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
अटक आरोपीचे नाव रवींद्र शिवाजी घाटे (वय ४०, रा. दहीवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे आहे. हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड तसेच पोलीस अंमलदार यांच्या पथकाने वाहनचोरीसंदर्भात माहिती गोळा करून विविध भागात गस्त व तपास सुरू केला.
पोलीस अंमलदार रविकांत कचरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पथकाने बार्शी, तुळजापूर, लातूर परिसरात शोधमोहीम राबवून रवींद्र घाटे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरलेल्या ४ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, दुसऱ्या तपासामध्ये एका अल्पवयीन मुलाला पकडून त्याच्याकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. हडपसर पोलिसांनी ३ लाख ३० हजार रुपयांच्या १ बुलेट, २ होंडा शाइन व २ टिव्हीएस रायडर अशा एकूण ५ दुचाकी जप्त केल्या आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या सूचना व नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दीपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखील पवार, निलेश किरवे, बापू लोणकर, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजित राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलिक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, महावीर लोंढे, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे यांनी केली आहे.















