चारचाकी गाडी मालकांची फसवणूक : कोरेगाव पार्क पोलिसांकडून ४ गाड्या जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून चारचाकी गाडी मालकांकडून गाड्या घेतल्यानंतर, चालक ठेवून त्या भाड्याने देत असे. मात्र मोबदला न देता फसवणूक करणाऱ्या भामट्याला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे.
सुमित सुनिल कवडे (वय २७, रा. कवडेवाडी, कोरेगाव पार्क) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने आतापर्यंत १० जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. दिघी पोलीस ठाण्यातही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
याबाबत विशाल रामदास चौधरी (वय ३६, रा. सोरतापवाडी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली होती. सुमित कवडे हा सोशल मीडियावर जाहिरात करून गाडी मालकांना जास्तीत जास्त परताव्याचे आमिष दाखवत असे.
गाडी मालकांकडून त्यांची चारचाकी गाडी घेत असे. त्या गाड्यांवर चालक ठेवून तो टुरिस्टचा व्यवसाय करत असे. मात्र गाडी मालकांना कोणताच मोबदला देत नसे. त्याने अनेक लोकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
त्याच्याकडून पैसे मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर, गाडी कोणत्यातरी टोलनाक्यावरून गेल्याची माहिती टोल चार्ज अलर्टमधून गाडी मालकांना मिळत असे. त्यावरून अनेक गाडी मालक प्रत्यक्ष जाऊन आपापल्या गाड्या ताब्यात घेत असल्याचे दिसून आले आहे.
कोरेगाव पार्क पोलिसांनी सुमित कवडे याचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्याच्याकडून २ इंटिगा, एक स्विफ्ट, एक वॅगनआर अशा चार गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याने अशाच प्रकारे अनेक लोकांना फसविले असल्याची शक्यता असून, जप्त केलेल्या गाड्यांबाबतची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे करीत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त संगीता अल्फासो शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे, हवालदार प्रविण पडवळ, सचिन पवार, राहुल मोकाशी, पोलीस अंमलदार गौरव म्हस्के, राहुल वेताळ, अंकुश खंनसोळे, प्रदीप ठाकूर, सुनील मारकड यांनी केली आहे.
















