विमानतळ पोलिसांनी २४५ सीसीटीव्ही फुटेजवरून काढला माग : ५ गुन्हे उघडकीस
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सुनसान रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन मुली व तरुणींची छेडछाड करून मोटारसायकलवरून पळून जाणारा रोड रोमिओ अखेर विमानतळ पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी तब्बल २४५ सीसीटीव्ही फुटेज तपासून लोहगावपासून भोसरीपर्यंत त्याचा माग काढत त्याला पकडले.
सागर राम सोनवणे (वय २२, रा. हनुमान कॉलनी, शास्त्री चौक रोड, भोसरी) असे या आरोपीचे नाव आहे. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ५ विनयभंगाचे गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली आहे.
लोहगाव येथील गणेश पार्क परिसरात मोटारसायकलवरून आलेल्या आरोपीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच घडली होती.
विमाननगर परिसरात यापूर्वीही अशा प्रकारचे काही गुन्हे नोंदवले होते. पोलीस अंमलदार योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लालू कर्हे आणि राहुल जोशी यांनी घटनास्थळावरील तसेच आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
त्यावरून विमाननगर, विश्रांतवाडी, दिघी, भोसरी या भागांत माग काढत तब्बल २४५ फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यातून सागर सोनवणेच हे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. विमाननगर परिसरात केलेले त्याचे ५ विनयभंगाचे गुन्हे उघडकीस आले असून, अन्य पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली आहे.
हा आरोपी रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर महिलांची छेडछाड करून मोटारसायकलवरून पळून जायचा आणि सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणार नाही याची काळजी घ्यायचा.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक शरद शेळके यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, मनोेज बरुरे, पोलीस अंमलदार योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लालू कर्हे, राहुल जोशी, रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, गणेश इथापे, दादासाहेब बर्डे, सागर कासार, पांडुरंग म्हस्के, सना शेख, आसमा शेख यांनी केली.















