लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई : अपंग सामाजिक कार्यकर्त्याकडून मागितली होती लाच
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : अपंग सामाजिक कार्यकर्त्याकडे प्रत्येक नवीन रेशन कार्डसाठी दीड हजार रुपये लाच मागून १६ हजारांची लाच घेताना अन्नधान्य वितरण कार्यालयातील परिमंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.
गजानन अशोकराव देशमुख (वय ३६, रा. निर्माण हिलसाईट, तळजाई पठार, धनकवडी) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. गजानन देशमुख हे अन्नधान्य वितरण कार्यालयातील भोसरी येथील ‘एफ’ झोनमध्ये परिमंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
तक्रारदार हे अपंग असून सामाजिक कार्य करतात. त्यांना शासकीय कागदपत्रांची माहिती असल्याने ते त्यांच्या मित्र व ओळखीच्या लोकांसाठी नवीन रेशन कार्ड काढून देण्यासाठी मदत करत असतात. तक्रारदारांच्या मित्र व ओळखीच्या अशा एकूण १४ जणांनी नवीन रेशन कार्डसाठीची अधिकारपत्रे आणि सरकारी शुल्क प्रत्येकी ५० रुपये त्यांना दिले. तक्रारदारांनी १४ जणांचे प्रस्ताव तयार करून आवश्यक कागदपत्रे जोडली व ५० रुपये फी ऑनलाईन भरल्यानंतर त्या १४ जणांना १४ रेशन कार्डचे ‘एन’ नंबर प्राप्त झाले.
त्यानंतर तक्रारदार हे १४ नवीन रेशन कार्ड मिळण्यासाठी भोसरी येथील अन्न नागरी पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक देशमुख यांना भेटले. त्यांनी प्रत्येक नवीन रेशन कार्डसाठी ९०० रुपये प्रमाणे एकूण १२ हजार ६०० रुपये द्यावे लागतील असे सांगितले. तक्रारदारांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
या तक्रारीची ११ डिसेंबर रोजी पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान देशमुख यांनी एकूण १९ हजार रुपयांची लाच मागितल्याचे, तडजोड करून १६ हजारांच्या मागणीवर तो तयार झाल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भोसरी येथील अन्नधान्य वितरण कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून गजानन देशमुख यांनी १६ हजार रुपयांची लाच घेताना गुरुवारी दुपारी त्यांना पकडण्यात आले. त्यांच्या विरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस आयुक्त अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे तपास करीत आहेत. देशमुख यांनी सुरुवातीस १४ रेशन कार्ड मंजूर करून त्यावर सही–शिक्का देण्यासाठी प्रत्येकी दीड हजार रुपये अशी मागणी केली होती. त्यावेळी तक्रारदारांनी चार जण खूप गरीब असल्याचे सांगितले.
त्यावर देशमुख यांनी १४ पैकी १० रेशन कार्डांसाठी प्रत्येकी दीड हजार रुपये म्हणजे १५ हजार रुपये मागितले, तर गरीब असलेल्या उर्वरित ४ रेशन कार्डांसाठी प्रत्येकी १ हजार रुपये म्हणजे ४ हजार रुपये अशी एकूण १९ हजार रुपये लाच मागितली. तडजोडीत १६ हजार रुपये स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले.
लाचेतही ‘डिस्काऊंट’
सध्या सर्वत्र डिस्काऊंटचा जमाना आहे. दोन वस्तू घेतल्यानंतर तिसरी वस्तू फ्री दिली जाते. विक्रेतेही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी असे डिस्काऊंट देतात. या परिमंडळ अधिकाऱ्यानेही तक्रारदाराला असाच ‘डिस्काऊंट’ दिला होता.















