सायबर पोलीस ठाण्यासह एकूण ४५ पोलीस ठाणी, नवीन ८३० पदांनाही मंजुरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गुन्ह्यांची वाढती संख्या आणि वेगाने होत असलेले नागरीकरण लक्षात घेता पुणे शहर पोलीस दलात आणखी ५ नव्या पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच या सर्व नवीन पोलीस ठाण्यांसाठी प्रत्येकी १६४ अशी एकूण ८३० नवीन पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
यासंबंधीचे आदेश शासनाने रविवारी दि. 14 डिसेंबर रोजी जारी केले आहेत. त्यामुळे पुणे शहरात आता सायबर पोलीस ठाण्यासह एकूण ४५ पोलीस ठाणी कार्यरत होणार आहेत.
सिंहगड रोड पोलीस ठाण्यातून नऱ्हे पोलीस ठाणे, येरवडा पोलीस ठाण्यातून लक्ष्मीनगर पोलीस ठाणे, हडपसर पोलीस ठाण्यातून मांजरी पोलीस ठाणे, विमानतळ पोलीस ठाण्यातून लोहगाव पोलीस ठाणे, कोंढवा व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यांतून येवलेवाडी पोलीस ठाणे अशा पाच नव्या पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे.
पुणे शहर पोलीस दलाने या नवीन पोलीस ठाण्यांसाठी आवश्यक जागा तसेच अन्य पायाभूत सुविधांबाबत प्राथमिक तयारी आधीच केली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मंजुरी मिळाल्यानंतर ही पोलीस ठाणी लवकरच कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
या ५ पोलीस ठाण्यांसाठी विविध संवर्गांतील ८३० पदे निर्माण करण्यास तसेच त्यासाठी येणाऱ्या ६७ कोटी ४१ लाख ६७ हजार २८० रुपये आवर्ती खर्चास आणि १ कोटी ८४ लाख ४० हजार रुपयांच्या अनावर्ती खर्चासही मान्यता देण्यात आली आहे.
या पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस निरीक्षक ४, सहायक पोलीस निरीक्षक ६, पोलीस उपनिरीक्षक १३, सहायक पोलीस उपनिरीक्षक १३, पोलीस हवालदार ४४ आणि पोलीस अंमलदार ८४ अशी एकूण १६४ पदांची निर्मिती करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये सध्या २ पोलीस निरीक्षक आणि एकूण साधारण १२५ पोलीस मनुष्यबळ कार्यरत आहे. पुणे शहरातील काही पोलीस ठाण्यांमध्ये ३ पोलीस निरीक्षकांची पदे आहेत. भविष्यातील गरजांचा विचार करून या नवीन पोलीस ठाण्यांमध्ये ४ पोलीस निरीक्षकांसह अधिक मनुष्यबळाची तरतूद आधीच करण्यात आल्याचे दिसून येत आहे.















