पुणे टाइम्स मिरर व सिव्हिक मिरर यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान: डॉ. किरण बेदी व अमृता फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पुणे शहराच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना प्रतिष्ठित ‘पुणे टाइम्स मिरर आयकोनिक पुणेकर पुरस्कार २०२५’ प्रदान करून गौरविण्यात आले.
पुणे टाइम्स मिरर आणि सिव्हिक मिरर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आयकोनिक पुणेकर पुरस्कार २०२५ – सिझन २’ चा भव्य कार्यक्रम कोरेगाव पार्क येथील ‘द वेस्टिन’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. या कार्यक्रमात पुण्याच्या संस्कृती, मूल्ये आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.
पुण्याच्या जीवनशैलीला सकारात्मक दिशा देणारे, शहराच्या समृद्ध शैक्षणिक व सांस्कृतिक वारशाचे जतन करणारे आणि समाजात परिवर्तन घडवून आणणारे कार्य केल्याबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘आयकोनिक पुणेकर पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला.
हा मानाचा पुरस्कार भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी व सुप्रसिद्ध समाजसुधारक डॉ. किरण बेदी तसेच बँकर, सामाजिक कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध सार्वजनिक व्यक्तिमत्त्व अमृता फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया हे शिक्षण आणि समाजसेवेच्या क्षेत्रातील त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे ओळखले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनने गुणवत्तापूर्ण, मूल्याधिष्ठित व समाजाभिमुख शिक्षण देण्याचे कार्य सातत्याने केले आहे.
विद्यार्थी जीवनाच्या विविध टप्प्यांपासून ते व्यावसायिक प्रशिक्षण, उद्योजकता विकास, कौशल्य विकास व सामाजिक उपक्रमांपर्यंत संस्थेचे कार्य विस्तारले आहे. या सोहळ्यात डॉ. किरण बेदी यांनी समाजसेवा, शिस्त व प्रभावी नेतृत्वावर आधारित प्रेरणादायी विचार मांडले, तर अमृता फडणवीस यांनी नेतृत्व, सामाजिक मूल्ये व पुणे शहराच्या बदलत्या सामाजिक-सांस्कृतिक ओळखीवर प्रकाश टाकला.
दोन्ही मान्यवरांनी प्रा. डॉ. चोरडिया यांच्या कार्याचे मनापासून कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रतिष्ठित पुरस्कारामुळे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, समाजातील अनेकांसाठी ते प्रेरणादायी आदर्श ठरले आहेत.
हा सन्मान माझ्या वैयक्तिक कार्याचा नसून सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या संपूर्ण परिवाराच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे. शिक्षण हे केवळ ज्ञान देण्याचे माध्यम नसून मूल्यनिर्मिती, समाजभान आणि राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी साधन आहे, या विश्वासातूनच आम्ही सातत्याने कार्य करत आहोत. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन















