जामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी साक्षीदाराकडून मागितली होती लाच : जेजुरीत कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सावकारीच्या कायद्याखाली दाखल झालेल्या गुन्ह्यात साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर न राहिल्याने पती-पत्नीच्या नावाने जामीनपात्र वॉरंट निघाले होते. हे वॉरंट बजावण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी गेले होते. वॉरंट दाखवून ते रद्द करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. नंतर प्रत्यक्ष लाच स्वीकारली गेली नसली तरी लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस हवालदारासह त्याच्या साथीदार असलेल्या खासगी व्यक्तीला अटक केली आहे.
पोलीस हवालदार दशरथ शिवाजी बनसोडे (वय ५७, रा. साळुंखे बिल्डिंग, मोरगाव रोड, जेजुरी, ता. पुरंदर) आणि खासगी व्यक्ती सचिन अरविंद चव्हाण (रा. चव्हाण वस्ती, वाल्हा, ता. पुरंदर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तक्रारदार यांच्या मुलाने २०१९ मध्ये एका व्यक्तीविरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात सावकारीच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांची पत्नी असे दोन साक्षीदार होते. या खटल्यात ते साक्ष देण्यासाठी वारंवार न्यायालयात हजर न राहिल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट काढले होते.
हे वॉरंट बजावण्याचे काम पोलीस हवालदार दशरथ बनसोडे यांच्याकडे देण्यात आले होते. बनसोडे हे सचिन चव्हाण यांना सोबत घेऊन ५ डिसेंबर रोजी तक्रारदार यांच्या घरी गेले होते. त्या वेळी त्यांनी वॉरंट रद्द करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितली होती.
याबाबतची तक्रार १० डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. त्याच दिवशी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यात हवालदार बनसोडे यांनी तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरुद्ध निघालेले जामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
तसेच बनसोडे यांच्यासोबत असलेले सचिन चव्हाण हे पोलीस कर्मचारी नसून खासगी व्यक्ती असल्याचेही स्पष्ट झाले. १० डिसेंबर रोजी रात्री पडताळणी झाल्यानंतर बनसोडे यांनी दुसऱ्या दिवशी तक्रारदार यांना “तुमचे पैसे नको, कागदपत्रे द्या,” असे सांगितल्याने सापळा कारवाई होऊ शकली नाही.
मात्र प्रत्यक्ष लाच घेतली नसली तरी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हवालदार दशरथ बनसोडे तसेच तक्रारदारास लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल सचिन चव्हाण यांना ताब्यात घेऊन बुधवारी त्यांच्याविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त भारती मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे तपास करीत आहेत.















