सायबर चोरट्याने औंधमधील ज्येष्ठ नागरिकाला घातला गंडा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गॅस कनेक्शन कट करण्याची भीती दाखवत औंध परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्याने २२ लाख ९४ हजार रुपयांची फसवणूक केली.
याबाबत ८७ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ७ व ८ डिसेंबर २०२५ रोजी घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्याने औंध येथील ट्वीन टॉवर्स येथे राहणाऱ्या ८७ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाशी संपर्क साधला.
आपण महाराष्ट्र गॅस निगममधून बोलत असल्याचे सांगून गॅस बिल अपडेट नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. बिल न भरल्यास गॅस कनेक्शन कट करण्यात येईल, अशी भीती दाखविण्यात आली. पैसे भरण्यासाठी त्यांना एपीके फाईल पाठविण्यात आली.
त्या फाईलच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यातील २२ लाख ९४ हजार रुपये ट्रान्सफर करून घेण्यात आले आणि फसवणूक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अश्विनी ननवरे करीत आहेत.















