शिराढोण–कळंब–जामखेड मार्गावरून महामार्ग जावा, यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांची एकजूट
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : लातूर–अहिल्यानगर–कल्याण हा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार असून, या महामार्गाचा मार्ग ठरवताना जनहिताचा विचार होणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर हा महामार्ग शिराढोण–कळंब–पारा–ईट–खर्डा–जामखेड–अहिल्यानगर–कल्याण या मार्गावरूनच जावा, या प्रमुख मागणीसाठी कळंब येथे एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक २० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात पार पडणार आहे. या बैठकीत महामार्गाच्या मार्गाबाबत सविस्तर चर्चा करून पुढील दिशा ठरवली जाणार आहे.
या बैठकीस कळंब, वाशी, भूम व जामखेड तालुक्यातील लोकप्रतिनिधी, प्रस्तावित मार्गावरील सर्व गावांचे सरपंच, विषयतज्ज्ञ, आजी-माजी पदाधिकारी तसेच जागरूक नागरिकांना निमंत्रित करण्यात आले आहे.
सदर महामार्ग या मार्गावरून झाल्यास या परिसरातील दळणवळण सुलभ होऊन कृषी, औद्योगिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपली भूमिका ठामपणे मांडावी व मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन लातूर–कळंब–जामखेड–अहिल्यानगर–कल्याण रोड संघर्ष समिती, कळंब यांच्या वतीने करण्यात आले आहे.















