आंबेगावमधील गायमुख चौकातील घटना : गावाकडून बहिणीला पळवून आणल्याचा राग
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : प्रेमसंबंधातून गावावरून आपल्या प्रेयसीला पळवून आणल्याचा राग मनात धरून तरुणीच्या भावाने पुण्यात येत साथीदाराच्या मदतीने तरुणाच्या डोक्यात वार करून त्याचा निर्घृण खून केला.
जावेद खाजामिया पठाण (वय ३४, रा. मुदखेड रोड, खाजानगर, भोकर, ता. भोकर, जि. नांदेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना आंबेगाव येथील गायमुख चौकातील गुरुदत्त वॉशिंग सेंटर येथे २२ डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे सात वाजता घडली.
याबाबत रौफ उस्मान शेख (वय ३५, रा. नर्हेगाव, मुळ रा. खाजानगर, भोकर, जि. नांदेड) यांनी आंबेगाव पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी संदिप रंगराव भुरके (वय २५, रा. भोकर, जि. नांदेड) व त्याचा साथीदार यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रौफ शेख व जावेद पठाण हे नातेवाईक असून ते मूळचे भोकर येथील रहिवासी आहेत. जावेद पठाण याचे संदिप भुरके याच्या मोठ्या बहिणीबरोबर प्रेमसंबंध होते. पंधरा दिवसांपूर्वी जावेद हा गावाला गेला होता. तेथून तो संदिप भुरके याच्या बहिणीला घेऊन पळून पुण्यात आला होता.
याचा राग मनात धरून संदिप भुरके व त्याचा साथीदार पुण्यात आले होते. जावेद कोठे काम करतो, याची त्यांना माहिती होती. २२ डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे सात वाजता ते गुरुदत्त वॉशिंग सेंटर येथे आले. त्यांनी जावेद पठाण याच्याशी वाद घातला.
त्यानंतर संदिप भुरके याने त्याच्याकडील हत्याराने जावेद पठाण याच्या डोक्यात व हातावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. यावेळी रौफ शेख याने त्याला का मारता, असे विचारले असता संदिप भुरके याने तू मध्ये पडू नकोस, असे सांगत शिवीगाळ केली व ते पळून गेले.
यानंतर रौफ शेख यांनी जखमी अवस्थेतील जावेद याला आंबेगाव येथील श्वास हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे प्राथमिक उपचार करून त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना जावेद पठाण याचा मृत्यू झाला.
आंबेगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत. पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले तपास करीत आहेत.

















