कौटुंबिक वादाची पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून पतीचे कृत्य : पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : काहीही कामधंदा न करता त्रास देत असल्याची तक्रार त्याची शिक्षिका असलेल्या पत्नीने पोलिसांकडे केल्याच्या रागातून पतीने तिचा दोरीने गळा आवळला तसेच लोखंडी गजाने डोक्यात व दोन्ही हातांवर मारहाण करून गंभीर जखमी केले. काळेपडळ पोलिसांनी पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
अनिल पंढरीनाथ माने (वय ४२, रा. साठेनगर, तरवडे वस्ती, महंमदवाडी, हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. जया अनिल माने (वय ३५) यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना महंमदवाडी येथील साठेनगर परिसरातील त्यांच्या घरी २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जया माने या हडपसर येथील एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा पती अनिल माने हा कोणताही कामधंदा करत नसल्याने तसेच कौटुंबिक कारणांवरून दोघांमध्ये वाद होत होते. याच कारणावरून जया माने यांनी पतीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली होती.
२२ डिसेंबर रोजी सायंकाळी घरात कोणी नसल्याचे पाहून अनिल माने याने जया माने यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने दोरीने गळा आवळला. तसेच लोखंडी गजाने त्यांच्या डोक्यावर व दोन्ही हातांवर मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव पुढील तपास करीत आहेत.
















