येवलेवाडी कमान येथील घटना, सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सहा महिन्यांपूर्वी दुसरीकडे राहण्यास गेलेल्या पानटपरी चालकाच्या डोक्यात टोळक्याने दगड घालून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. आकाश कृष्णा चाबुकस्वार (वय २१, रा. एकनाथपुरम सोसायटी, फुरसुंगी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
येवलेवाडी पोलिसांनी या प्रकरणी सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना येवलेवाडी कमानपुढील मिनू मेहता सोसायटीकडे जाणाऱ्या गल्लीत १ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश चाबुकस्वार हा पूर्वी कोंढवा येथील लक्ष्मीनगर परिसरात राहत होता. मागील सहा महिन्यांपासून तो फुरसुंगी येथे राहायला गेला होता. तो आणि त्याचा भाऊ मिळून हांडेवाडी येथे पानटपरी चालवत होते.
आकाश चाबुकस्वार हा त्याचा मित्र आणि मैत्रिणीसोबत देवदर्शनासाठी गेला होता. तेथून परत येताना ते येवलेवाडी कमान परिसरात आले असता काही जणांनी त्याला अडवले. पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून त्यांच्यात वादावादी झाली.
ही वादावादी सुरू असतानाच आणखी तीन ते चार जण तेथे आले. सर्वांनी मिळून आकाश याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर तेथे पडलेला दगड उचलून त्याच्या डोक्यात मारण्यात आला. आकाश हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसताच हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.
आकाश चाबुकस्वार याला त्याच्या मित्राने आणि पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. येवलेवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.















