तितिक्षा इंटरनॅशनलच्या दशकपूर्ती सोहळ्यात सन्मान : ‘साहित्य समाजप्रबोधनाची गुरुकिल्ली’, प्रा. डॉ. संजय चोरडिया
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : मराठी साहित्य, कला आणि समाजप्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या दशकपूर्ती व वर्धापन सोहळ्यात सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सला प्रतिष्ठेचा ‘तितिक्षा आंतरराष्ट्रीय दीपस्तंभ पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
पुण्यातील साहित्य, कला आणि सामाजिक प्रेरणेच्या क्षेत्रात विशेष स्थान निर्माण केलेल्या तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेचा दशकपूर्ती व वर्धापन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देणे, मराठी साहित्याचा प्रसार करणे तसेच समाजातील कलात्मक संवेदनशीलता वाढवणे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या बावधण कॅम्पसमधील बंसिरत्न ऑडिटोरियममध्ये झालेल्या या सोहळ्यात साहित्य, संगीत, कला आणि समाजकार्य यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. या गुणगौरव सोहळ्यात तितिक्षा इंटरनॅशनलच्या वतीने सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सला त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक योगदानाबद्दल ‘तितिक्षा आंतरराष्ट्रीय दीपस्तंभ पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
सूर्यदत्तच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविताना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी साहित्य आणि समाजप्रबोधनाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “साहित्याचा प्रभाव केवळ वाचनापुरता मर्यादित नसून तो समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचला पाहिजे.
सकारात्मक सामाजिक परिवर्तनासाठी साहित्य आणि कलेचा विस्तार अत्यावश्यक आहे.” त्यांनी तितिक्षा इंटरनॅशनलच्या दहा वर्षांच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते झाले.
त्यांनी आपल्या मनोगतात सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांच्या संवर्धनावर भर दिला. या सोहळ्यात समाजसेविका तृप्ती देसाई, सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांच्यासह साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य व कला विभागाचे श्री. चंद्रकांत कुलकर्णी, न्यायाधिकरणाचे संपादक अमित सिंह तसेच पुण्याचे पोलीस उपआयुक्त (DCP) गणेश जोशी यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन तितिक्षा इंटरनॅशनलच्या स्थापक अध्यक्षा प्रिया दामले यांनी केले.
तितिक्षा भावार्थ परिवाराच्या या उपक्रमामुळे नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळून मराठी भाषा व साहित्य क्षेत्रात नवनिर्मितीला चालना मिळत आहे. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यामुळे कार्यक्रमाचे महत्त्व अधिकच वाढले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनामुळे हा सोहळा साहित्य, कला आणि समाजकार्य यांचा प्रेरणादायी संगम ठरला.

















